cooker sloww (2)

स्लो कुकर वापरण्याआधी ‘हे’ वाचा!

कुकरचा शोध लागल्यानंतर पदार्थ बनवणं जसं सोप्पं झालं, तसं स्लो कुकर आल्यापासून एकाचवेळी अनेक पदार्थ बनवणं सोप्पं झालंय. किचनमधल्या एखाद्या कोप-यात त्याचा स्विच लावून, योग्य प्रमाणात जिन्नस एकत्र करुन टाईमर लावून शिजवत ठेवले, की सुगरणीचं काम झालं. मग, ती निर्धास्तपणे गॅस शेगडीवर बाकीचे पदार्थ बनवू शकते. स्लो कुकरमधला पदार्थ शिजला आणि टाईमर संपला की कुकर आपोआप बंद देखील होईल.

यामुळे, मुख्यत्वे वेळ वाचतो, त्यामुळे किचनमधील इतर कामंही झटपट हातावेगळी करता येतात. सर्व जिन्नस सुरुवातीलाच एकत्रितपणे शिजवत ठेवता येतील, अशा रेसिपीज या स्लो कुकुरमध्ये छान तयार होतात. टाईमर लावून पदार्थ शिजवता येत असल्याने, लक्षपूर्वक कुकरच्या शिट्या मोजत बसावे लागत नाहीत. शिट्टी मोजण्यात चूक झाली, तर पदार्थ करपेल अशी भितीही नसते. परवडाणा-या किंमतीत ही वस्तू बाजारात उपलब्ध आहे. त्याचा सुरक्षित वापर करताना काही बाबी लक्षात ठेवायला हव्यात.

इलेक्ट्रॉनिक कुकर असल्याने त्याची वायर नियमित तपासणे गरजेचे असते. वापर करण्यापूर्वी नेहमी वायरचे एक टोक कुकरला व दुसरे स्विचबोर्डला, अशी दोन्ही टोके घट्ट लागलीत याची खात्री करुन घ्यावी.

हा कुकर सपाट जागेवरच ठेवावा. तसेच, त्याच्या आजूबाजूला पाण्याचा ओल असता कामा नये. स्लो कुकरसाठी किचनच्या ओट्यावरील कोरडी जागा निवडावी. लायटर, कपडा तेल अशा वस्तू या कुकरपासून कटाक्षाने दूर ठेवाव्यात.

टाईमर बंद झाल्यावर लगेचच कुकर उघडायला जाऊ नये. प्रथम स्विच बंद करावा व ५ मिनिटांनी कुकरचे झाकण उघडून ते २ ते ४ मनिटे तसेच ठेवावे आणि मग पदार्थ त्यातून सर्व्ह करण्यासाठी दुस-या भांड्यात घेता येईल.

वयस्कर व्यक्तिंसाठी स्लो कुकर सोयीचा ठरतो. बरेचदा, वयानुरुप रेसिपीज फार लक्षात रहात नाहीत. कधी केव्हा गॅस बंद करावा याच्या वेळांकडे दुर्लक्ष होतं. पदार्थ जास्त शिजतो, कधी करपतो. यामुळे जिन्नस फुकट जातात आणि भांडीही खराब होतात. ह्या सगळ्यावर उपाय म्हणून स्लो कुकरचा पर्याय योग्य ठरेल. फक्त ही वस्तू काळजीपूर्वक हाताळायला हवी.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares