home (1)

स्वउद्योगाचा ऑनलाईन ब्रॅण्ड तयार करताना!

घरगुती उद्योगांची क्षेत्रे आता प्रचंड विस्तारलीत. तिचा व्यवसाय किचनची वेस ओलांडून स्वत:च्या पंखातील बळ आजमावू लागलाय. कलाकुसर, शिवणकाम, भरतकाम, चित्रकला, वादन, नृत्य, गायनाच्या कार्यशाळा, योगा ट्रेनर, ज्वेलरी मेकींग अशी भन्नाट क्षेत्रे फक्त छंद म्हणून न जोपासता, तिने त्याचेच व्यवसायात रुपांतर केलेय. किचनपूर्ता मर्यादित ठेवला गेलेला तिचा आत्मविश्वास इथे लख्ख दिसतो. व्यवसायाचा गाभा असणा-या भांडवलाची जमवाजमव मोठ्या चतुराईने करावी लागते. हे भांडवल कमी असो किंवा जास्त सध्या नव्या तंत्रज्ञाशिवाय व्यवसायाला मूर्तरुप मिळणे केवळ अशक्य!

स्वत:च्या व्यवसायाला प्रतिष्ठा व उत्पादनाला नावलौकिक मिळवून देण्यासाठी तुमच्या मेहनतीला ‘ऑनलाईन ब्रॅण्ड’चं रुपडं देणं गरजेचं आहे. एकाच वेळी लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचवणारी टेक्नोलॉजीची ताकद नाकारता येणार नाही.

  • ओळख –

लघुउद्योग सध्या सामान्य पातळीवर असला, तरी योग्य दिशेने प्रयास केल्यावर तो व्यापक रुप घेणार आहे. हे गृहित धरुन सुरुवातीपासूनच छोट्या प्रयत्नास त्याची ओळख द्यायला हवी. कंपनीचे नाव, कंपनीचा लोगो, टॅगलाईन ठरावावी. ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचण्याआधी त्याचे बाह्यरुप पोहोचते आणि तुम्हाला माहितीच आहे, ‘फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन’.

  • ग्राहक –

वयोगट, ठिकाण, कामाचे क्षेत्र, छंद, आवडी, ट्रेंड्स अशा घटकांचा विचार करुन ग्राहकवर्ग निश्चित करावा. तरुणाईपासून पौढांपर्यंत कुठलाही ब्रॅण्ड ऑनलाईन मार्गाने जलद पोहोचतो. सोशल मिडीआद्वारे असा लक्षित ग्राहक निवडून, त्याच्यापर्यंत पोहोचता येते.

  • सोशल मिडीआ –

व्यवसायाच्या प्रकारानुसार सोशल मिडीआ साईट्सची निवड करावी. त्यांचे व्यवसायिकांसाठीचे नियम व अटी नीट अभ्यासून घ्याव्यात. उद्योगाबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी फेसबुक, गुगल ब्लॉग्स, ट्विटरचा वापर करता येईल. उत्पादनाचे फोटोज आकर्षकरित्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंटरेस्ट व इंस्टाग्राम या साईट्सची निवड करणे योग्य ठरेल.

  • वेबसाईट –

आपण आता ऑनलाईन शॉपिंग करण्यात पटाईत झालोत. वेबसाईट्सना भेट देऊन तिथे हवी ती वस्तू एका क्लिकवर घरपोच मागवतो. मग, या ‘क्लिक ऍण्ड शॉप’च्या जमान्यात तुमचा लघुउद्योग देत असलेली सेवा अशी वेबसाईट्सवर यायला हवी. उदा. तुमच्या कलाकुसरीच्या वस्तू ग्राहक ऑनलाईन विकत घेऊ शकतील, तुम्ही कला किंवा योगा, व्यायाम अशा कार्यशाळा घेत असाल, तर त्याचे ऑनलाईन बुकींग लोकांना करता येईल.

  • अपडेट्स –

समान व्यवसायात असणा-या स्पर्धक कंपनींचा मागोवा घेऊन, या क्षेत्रातील नवनव्या बाबींविषयी माहिती करुन घ्यावी. त्यानुसार, स्वत:च्या उत्पादनात योग्य ते बदल करावेत. ज्याप्रमाणे, पूर्वी ऑनलाईन मागवलेले उत्पादन हातात मिळाल्यानंतर ग्राहक त्याचे पैसै द्यायचा. आता, ऑनलाईन पेमेंटचा जमाना आला असून, विविध ऍप्स वापरातून हे पेमेंट करणे अधिक सोप्पे केले गेले आहे.

सध्याच्या काळात कंपनी ऑनलाईन पटलावर दिसली, तरच ती वर्तमानातली मानली जाते व भविष्यात व्यवसायिक स्पर्धेतील तिचे स्थान निश्चित होते. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचायचं, तर मेसेज, इमेल, ब्लॉग, सोशल मिडीआ, वेबसाईट या सा-याच्या एकत्रित वापरातून स्वत:चा ‘ऑनलाईन ब्रॅण्ड’ तयार करावा लागेल.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares