bridal banner

स्वत:ला शोभेलसा लेहेंगा पारखून घेताना…

लेहेंगा फॅशन नवीन नाही, पण इतक्या वर्षानंतरही ती आऊट डेटेड झालेली नाही; हेही तितकच खरं! वधूपासून व्हराड्यांपर्यंत कुणीही ही लेंहेगा स्टाईल पुन:पुन्हा आजमावण्यासाठी कायम तयार असतं. त्याच्या नावाप्रमाणेच भरगच्च नक्षीकाम असलेला घेरदार  लेंहेगाच तर याचं विशेष आकर्षण असतो. त्यावर मग शॉर्ट टॉप, बेल स्लिव्ह टॉप किंवा स्लिवलेस टॉप असं काहीही छान दिसतंच. सोबत बुट्टे भरलेला पारदर्शकसा दुपट्टा, आ..हा…! अशा पेहरावानंतर चार चौघांत उठू दिसलो नाही, तरच नवल! इथे अट एकच लेहेंग्याची निवड अचूक असायला हवी.  त्याचा रंग, त्याचं हटके कॉम्बिनेशन निवडताना पुढील बाबींकडे कानाडोळा करुन चालायचे नाही.

  1. त्वचेचा रंग ध्यानात घेऊन लेहेंग्याचा रंग निवडावा. गो-या कांतीस कुठलाही रंग शोधत असला, तरी ट्रेंडी रंगावर लक्ष ठेवावे. सावळ्या रंगासही भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. फक्त कॉम्बिनेशन विचारपूर्वक निवडावं. जसं फिकट किंवा सॉफ्ट कलर्सना प्राधान्य द्यावं. फार भडक, फ्लोरोसंट कलर्स शक्यतो टाळावेत.
  2. नंतर विचारात घ्यावी उंची. कमी उंची असल्यास मोठ्या बॉर्डरचा लेहेंगा घेऊ नये. यामुळे, शरीराची उंची अधिक कमी वाटते. त्यामुळे, सुरेख नाजूक काम व बारीक बॉर्डर असणारा लेहेंगा निवडावा. तर इतर सर्वसामान्य किंवा त्याहून अधिक उंची असणा-या मुलींनी मोठ्या बॉर्ड्सची हमखास निवड करावी.
  3. अंगकाठी बारीक असल्यास घेरदार लेहेंगा छान दिसेल आणि स्थूल शरीरयष्टी असल्यास घेर थोडा कमी घ्यावा. जेणेकरुन तो अधिक फुलणार नाही. त्यामुळे, घेर कमी असला तरी नक्षीकामी मात्र सुरेख असावे, ते शोभून दिसेल.
  4. टॉप जवळील डिझाईन लक्षात घेऊन त्यानुसार लेहेंग्यावर घालायचे दागिने निवडावेत. अशावेळी, गळ्याला घट्टसा हार छान दिसेल किंवा गळ्यात काही न घालता, नुसते मोठ्ठे झुमके किंवा लोंबते कानातले घालण्याची फॅशन आहे. तेही मस्त दिसते.
  5. वरील मुद्द्यांसोबत, लेहेंग्याचे वजन विचारात घेण्यास विसरु नये. कपड्याचा पोत व नक्षीकामावरुन त्याचे वजन ठरते. लेहेंगा जितका भरलेला असेल तितके वजन वाढत जाते. त्यामुळे, आपल्याला झेपेल तितक्याच वजनाचा लेहेंगा घ्यावा.

चित्रपटांतील जाहिरातींतील फॅशनेबल लेहेंगे खरेदी करण्याआधी वरील मुद्द्यांचा सारासार विचार करायला विसरु नये. तरच, विकत घेतलेला लेंहेंगा आपल्यावर खुलून दिसेल यात दुमत बिलकूल नाही.

More Articles
Designed and Developed by SocioSquares