Purse BANNER

तुमच्या पर्समध्ये काय असतं?

विविध क्षेत्रांत स्वत:ला सिद्ध करणा-या आजच्या स्त्रियांना उच्चशिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त घरापासून दूर रहावे लागतं. कधी रात्री अपरात्री प्रवासही करावा लागतो. कामाच्या विचित्र वेळा असणा-या मैत्रिणींनी, तर कायमच स्वसंरक्षणासाठी सज्ज असायला हवे.  कारण, शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधताना शारीरिक दुर्बलतेवरही विजय मिळवायला हवा. म्हणजेच शक्तीला युक्तीची जोड हवी.

घराबाहेर पडताना प्रत्येकीकडे लहानशी बॅग असतेच. ज्यात पैसे, रुमाल, मोबाईल, लहानसा मेकअप कीट असं काही साहित्य असतं. यापुढे स्वसंरक्षणार्थ काही वस्तूही सोबत ठेवा, यासाठी खालीलपैकी सोयीस्कर वाटणा-या वस्तूंची निवड करता येईल.

पेपर स्प्रे –

दिसायला परफ्युम स्प्रे सारखाच असणारा पेपर स्प्रे, आकाराने मात्र लहान असतो. मुठीत मावेल इतक्या आकाराचा पेपर स्प्रे बाजारात उपलब्ध आहे. या स्प्रेचा वापर करताना, त्याचा फवारा व्यक्तिच्या थेट डोळ्यात मारावा. यामुळे डोळे चुरचुरुन, थोडावेळ तरी त्या व्यक्तिस नीटसे दिसत नाही; याचाच फायदा घेऊन आपल्याला पळ काढण्यास वेळ मिळतो.

सेफ्टी रॉड –

आकारास उंचीला छत्रीच्या दांड्या इतका असणारा सेफ्टी रॉड, फोल्ड करता येतो. त्यामुळे, तो लहान मोठ्या बॅगमध्ये कॅरी करणे सोप्पे जाते.

फ्लॅशलाईट –

मोबाईलला दिलेला फ्लॅशलाईट आणि सेफ्टी फ्लॅशलाईट हे दोन भिन्न प्रकार असून, याची तिव्रता कित्येक पटीने जास्त असते. बाजारात टू इन वन प्रकारातील फ्लॅशलाईट उपलब्ध आहेत. उदा. एका बाजूने लिपस्टिक, तर दुस-या बाजूने फ्लॅशलाईट, जो हाताळण्यास सोप्पा व छोट्या पर्समध्येही सहज मावणारा असा आहे. फ्लॅशलाईट व्यक्तिच्या डोळ्यावर धरावा, याच्या प्रखर प्रकाशाच समोरच्याला दिसत नाही. हिच संधी साधून दुस-या हाताने त्यावर वार करावा.

आणखी काही वस्तू ज्या आपल्या जवळ शक्यतो नेहमी असतात, मात्र ऐनवेळी त्यांचा वापर करणे सुचत नाही. उदाहरणार्थ, पेन, बेल्ट, छत्री, वर्तमानपत्र किंवा पुस्तक गुंडाळून बनणारी नळी, छत्री या वस्तूचा अचूक वापर करुन वार करता येऊ शकतो.

स्वत:च्या रक्षणासोबत इतरांच्या रक्षणासाठी या ट्रिक्स वापरता येतील. अतिप्रसंगाशिवाय इतरही अनेक लहान सहान विकृतींना सध्या महिला तोंड देतायेत. रस्त्यावरुन जाताना मुद्दाम दिलेला धक्का, ट्रेन किंवा गर्दीचा फायदा घेऊन काढलेली छेड, केलेला स्पर्श, चोरी असे प्रसंग नजरेस आल्यास, बघ्याची भूमिका न घेता प्रसंगावधान राखून स्वसंरक्षणासाठी बाळगलेल्या साहित्याचा बिनचूक वापर करता येईल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares