हा संकल्प बाप्पासाठी!!

व्यक्तिच्या जीवनात सणांचे स्थान आत्यंतिक महत्त्वाचे आहे. परंपरा, संस्कृती या सा-याच जिव्हाळ्याच्या गोष्टी. नात्यांचे बंध दृढ करणारे हे सण आपण मोठ्या उत्साहाने साजरे करतो, अगदी व्यस्त वेळापत्रकाला थोडा विराम देत सोहळ्याची तयारी करताना ‘कमी वेळात पुष्कळ कामे’ अशी अवस्था होऊन जाते. यावर उपाय म्हणून साहजिकच शॉर्टकट्सना प्राधान्य देतो कारण, एखादं दोन दिवसाच्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर रुजू व्हायचे असते. गणेशात्सवासाठी तयार मोदकांसोबत रेडीमेड मखर, प्लॅस्टिक फुलांच्या माळा असी झटपट तयारी करुन भक्तीभावाने गणेशाच्या स्वागतासाठी आपण तयार होतो. खाद्य पदार्थ विकत आणणे हा वेळ वाचवण्यासाठी उत्तम पर्याय असला तरी, प्लॅस्टिक किंवा थर्माकॉलचा अतीवापर निसर्गाला हानिकारक ठरतो याची जाणीव असूनही वेळेच्या अभावामुळे हेच पर्याय बरे वाटतात कारण, गणेश मूर्तीच्या भोवताली सजावट करण्यासाठी थर्माकॉलचे मखर तुलनेने स्वस्त तसेच, वेळखाऊ देखील नसतात. मात्र, याच्या वापरातून आपलेच नुकसान कसे होते हे समजून घेणे आवश्यक आहे. थर्माकॉल हा पाण्यात विरघळत नाही तसेच, तो जाळल्यास त्यातून दुषित वायू तयार होतो जो शरीरासाठी हानिकारक ठरतो, म्हणजेच थर्माकॉलचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही म्हणुन आता, विघ्नहर्त्याच्या साक्षीने आपण करुया संकल्प पुढील वर्षासाठी!

सण साजरा करताना पर्यावरणाचा थोडा विचार करुन इको फ्रेंडली डेकोरेशन करण्यावर भर देऊया. निसर्गाला हानी न पोहोचवणारे सजावटीचे काही पर्याय पुढे देत आहोत, ज्यांच्या वापरातून तुम्ही आकर्षक डेकोरेशन करु शकता अगदी बिनधास्त!

  1. कागदी पताका – रंगीबेरंगी कागदी पताकांचा वापर करता येईल, या पताकांना विविध आकार देऊन किंवा पतांकांवर नक्षीदार कटवर्क देखील शोभुन दिसेल.
  2. कापडाची सजावट – सुती कापडावर भरतकाम किंवा क्लॉथ पेंटिंगचा पर्याय वापरुन हवे ते डिझाईन करता येईल तसेच, नायलॉनच्या कपड्यावर विविध रंगांची लेस किंवा रिबीन लावता येईल.
  3. विणकामाची सजावट – विणकामाच्या साहाय्याने तोरण तसेच, आसन सजवण्यासाठी शोभेच्या वस्तू बनवता येतील यामध्ये आकार, रंग यांचे अनेक पर्याय देखील उपलब्ध होऊ शकतात.
  4. पाना फुलांची सजावट – मुख्यत्वे दिड दिवस मुक्कामी असणा-या बाप्पासाठी ही सजावट अधिक उपयुक्त ठरेल. मूर्तीच्या भोवती गोलाकाररित्या फुलांची आरास करता येईल किंवा फुले व बांबूच्या काड्यांचा वापर करुन मखर तयार करता येईल.
  5. कागदी लगदा – देखावे बनवण्यासाठी कागदी लगदा उपयुक्त ठरेल. याच्या वापारातून विविध आकार व रंगांचा मेळ साधता येईल.

हे पर्याय निसर्गाचे नुकसान करीत नाहीत, उलट आपल्या कल्पकतेला वाव देतात. कागद, कापड यांचा कुशलतेने केलेला वापर तसेच, विणकाम – भरतकाम या कलांची आकर्षकता लक्ष वेधून घेते. सोहळ्याची तयारी घरातील वातावरण आनंदी करते. अशीच, गणेशोत्सवाची सजावट करण्यासाठी घरातील सर्वांनी हातभार लावल्यास काम पूर्णत्वास जाईलच, सोबत मनोमन समाधान असेल बिघडत्या पर्यावरणाचा विचार करुन नैसर्गिक सजावटीला प्राधान्य दिल्याचे!

Image source- https://goo.gl/tCQtsi https://goo.gl/b2MRM9 https://goo.gl/HgVZ4U

More Articles
Designed and Developed by SocioSquares