WINTER (1)

हिवाळी पिकनिक स्पॉट्स!

कुटुंब किंवा मित्रमंडळींसोबत तुम्ही लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर हमखास पाहिले असेल. महाराष्ट्रात इतके निसर्गसंपन्न भूप्रदेश आहेत, की त्यानुसार प्रत्येक जिल्ह्या, तालुक्याचे ते वैशिष्ट्य बनून राहिले आहे. म्हणूनच, यंदा या नेहमीच्या पर्यटन स्थळांना जरा बाजूला सारुन, निराळ्या ठिकाणांची सफर करुया. कुठलंतरी नवं निसर्गरम्य ठिकाण गाठण्याची इच्छा तुम्हीही मनी बाळगून असाल, तर आजचा पर्यटन विशेष लेख तुमच्यासारख्या भटुकड्यांसाठीच,

  • भंडारदरा –

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेले भंडारदरा गाव! डोंगरदरे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध हवा अनुभवण्यासाठी हिवाळ्यात एकदा तरी इथे भेट द्यायलाच हवी. भंडारद-यातील जलविद्युत केंद्र, धरण व धबधबा हे मुख्य आकर्षण असून, जवळच कळसुबाई शिखर असल्याने ट्रेकिंगचाही प्लॅन करता येईल. गावापासून साधारण ६ किलो. अंतरावरुन शिखरावर जाण्याची चढण लागते.

  • नाशिक –

हिवाळ्यात धुक्याने वेढले जाणारे नाशिक उंचावरुन पाहाण्याची मज्जा काही औरच! इथे मांगी-तुंगी किल्ला आणि सप्तशृंगी गड, या गडाच्या पूर्वेला मार्कंण्डेय डोंगर, तर दक्षिणेला सतीचा कडा व गणेश मंदीर वसले आहे. सोबत विशाल धरणांचे दर्शन घडताच मन तृप्त होते. भारतातील ‘वाईन कॅपिटल’ म्हणून ओळखले जाणा-या नाशिक मधील वाईनयार्डची भव्यताही पाहाण्यासारखी आहे.

  • तारकरली –

समुद्र किनारा आणि हिवाळा हे कॉम्बिनेशनही पर्यटकांच्या पसंतीचेच! थंड वारा व अथांग किना-यावरील शांतता नेहमीच मोहविते. सोबत स्कुबा ड्रायव्हिंगसारख्या साहसी खेळांचा आनंदही इथे घेता येईल. थंडीत कुडकुडत न बसता ख-या अर्थाने हवेतील गारव्याचा आनंद घ्यायचा, तर महाराष्ट्राला लाभलेल्या सागर किना-याचे हिवाळी सौंदर्य पाहायलाच हवे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात, मालवण तालुक्यात वसलेले तारकरली एक छान पर्याय आहे.

  • ताम्हिणी घाट –

सह्याद्रीच्या पर्वत रांगात दडलेला निसर्गरम्य ताम्हिणी घाट! येथे लहान मोठ्या डोंगरांवरुन बेंधुद वाहाणा-या अवखळ पाण्याचे दर्शन घडेल, ते हल्लीच ओसरलेल्या पावसामुळे! आता त्यात अंग गोठवणारा गारठा व पांढ-या शुभ्र धुक्याची भर पडेल. मुंबईपासून १४० किमी अंतरावर, तर पुण्याच्या पौडपासून ९३ किमी अंतरावर ताम्हिणी घाट आहे. मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्यापासून ऍम्बी व्हॅली रस्त्याने ताम्हिणी घाटावर पोहोचता येते.

  • म्हैसमाळ –

मुंबईपासून ३६० किमी, तर औरंगाबादपासून अवघ्या ३६ किमी अंतरावर वसलेले ‘म्हैसमाळ’ हे निसर्गरम्य ठिकाण! दौलताबाद किल्ला, वेरुळ लेणी, घृष्णेश्वर मंदीर ही येथील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे. हिवाळ्यात डोंगर द-यांतून पठारावर उतरणारे ढग, मान्सूनमुळे नटलेली हिरवी धरती, लहान मोठे तलाव, जंगले अशा वैविध्यांनी परिपूर्ण असणारे ‘म्हैसमाळ’ मराठवाड्यातले मिनी महाबळेश्वर म्हणूनच ओळखले जाते.

सुरु झालेल्या थंडीचा कडाका येत्या महिन्यात अजून वाढेल आणि निसर्गही तितकाच अधिक मोहरेल! तुम्ही भरपूर भटुकडे एकत्र सहलीवर निघत असाल, तर वन डे ट्रिपऐवजी, वन नाईट पिकनिकही प्लॅन करता येईल.  ट्रेकींग, किंवा एखाद्या पठारावर शेकोटीभोवती उभारलेले टेंट, गाण्यांची मैफील, डोक्यावर मोकळे आकाश, तर पायाशी मातीचा गारवा अशा रोमांचक सहलीचाही विचार करायला हरकत नाही. काय मग, यंद्याच्या हिवाळी पिकनिकसाठी तुम्ही कुठले ठिकाण निश्चित करतायं? तुमच्या प्रतिक्रिया लिहा खालील कमेन्टबॉक्समध्ये,

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares