donuts banner

हॅप्पी डोनट्स डे!!

आकार एक असला, तरी अनेक रंगांत उपलब्ध असणारे ‘डोनट्स’! प्रत्येकाची पसंती मिळविणारा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता घरच्याघरी! सुगरणींनो, तयार आहात ना टेस्टी डोनट्स बनविण्यासाठी?

साहित्य-

२ कप मैदा, ३/४ कप दूध, १/४ कप बटर, २ टे.स्पू. साखर, १ छोटा चमचा ड्राय एक्टीव ईस्ट, १/२ छोटा चमचा मीठ, तेल, ब्राऊन चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, आईसिंग शुगर(सजावटीसाठी)

पाककृती-

१. प्रथम मैदा चाळून घ्यावा. आता पीठामध्ये साखर, मीठ, ड्राय ईस्ट व बटर घालून सर्व जिन्नस एकजीव करुन घ्यावे.

२. नंतर, कोमट दूधामध्ये पीठ मळून घ्यावे. (इतक्या पीठासाठी १/२ कपहून थोडे जास्त दूध लागते, हे पीठ मऊसर होईपर्यंत नीट मळावे.)

३. तयार पीठाचे गोळे करावेत. बोर्डवर सुके पीठ घेऊन, त्यावर पीठाचा गोळा लाटण्याने जाडसर लाटून घ्यावा.

४. लाटलेल्या शीटवर ग्लास किंवा वाटीच्या साहाय्याने गोल डोन्ट्स कापून घ्यावेत. कापलेल्या डोनट्सच्या मध्ये कुठल्याही बॉटलच्या झाकणाने दाबून, गोल भोक पाडावे.

५. सगळे डोनट्स कापून झाल्यावर, डोनट्सच्या वरील बाजूस तेल लावून साधारण दीड ते दोन तासांसाठी झाकून ठेवावेत.

६. आता, फुललेले डोनट्स तळण्यासाठी कढईत तेल गरम करावे. मंद आचेवर डोनट्स गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यावे.

७. गरमागरम डोनट्स पीठीसाखरेत घोळवावेत.

८. आता, डोनट्स पाककृतीतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे सजावटीचा; जो तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल.

९. प्रथम डार्क चॉकलेट व व्हाईट चॉकलेट वेगवेगळ्या भांड्यांत घेऊन मध्यम आचेवर मेल्ट करावे. मेल्ट केलेले चॉकलेट भांड्यात घेऊन सतत ढवळत रहावे.

१०. चॉकलेटला साधारण २० ते २५ मिनिटांत वितळेल.

११. चॉकलेटचे हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर डोनट डार्क चॉकलेट किंवा व्हाईट चॉकलेटमध्ये डिप करावा.

१२. चॉकलेट कोनमध्ये घेलत्यास विविध लाईन्स किंवा ठिपक्यांनी डोनट्स आणखी सजवता येतील.

अशाप्रकारे, विविध रंगातील क्रिम किंवा शुगर कोटिंग्सचा वापर करुन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे डोनट्स सजवू शकता. चला, झटपट तयारीला लागा आणि चविष्ट असे आकर्षक डोनट्स घरातील खवय्यांना सर्व्ह करताना म्हणा, “विश यु हॅप्पी डोनट्स डे!”

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares