Holika (1)

होळीच्या रंजक लोककथा!

वातावरणातील बदलांशी सुसंगत असणा-या सण सोहळ्यांपैकी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेस साजरी होणारी होळी देखील आरोग्यदायी गुणधर्मांचा संचय असलेली आहे. ‘होलिकादहन’, ‘शिमगा’, ‘हुताशनी महोत्सव’, ‘दोलायात्रा’ अशा विविध नावांनी ओळखल्या जाणा-या होळी या सणामागील प्रचलित लोककथा व सण साजरा करण्याच्या पद्धतीही तितक्याच भिन्न आहेत. हिवाळ्यास निरोप देणारी व उन्हाळ्याच्या स्वागतासाठी उत्सुक अशी होळी म्हणजे तरुणाईच्या भाषेतील जणू ‘कॅम्प फायर’!

शेकोटी करुन त्याभोवती गप्पा गोष्टी किंवा गाणी म्हणत धम्माल करण्याचा पिकनिक ट्रेंड वर्षभर सुरु असला तरी, सामाजिक बांधिलकी जपणारी ‘होळी’ अधिक आकर्षक भासते. अशीच गावाच्या एकोप्याची गोष्ट सांगणारी होळीची एक लोककथा आहे, म्हणे एका गावात राक्षसीणीने उच्छाद मांडला होता, ती गावातील लहान मुलांची हत्या करु लागली. ह्या संकटावर उपाय म्हणून गावक-यांनी वेशीवर व प्रत्येकाच्या अंगणात होळ्या पेटवल्या. गावभर होळ्या पेटलेल्या पाहून ती थोडी घाबरली, मग लोकांनी होळी भोवती नाचायला, वाद्य वाजवायला सुरुवात केली. तो गोंधळ, प्रत्येकाच्या दारासमोरील अग्नी, माणसांचे ओरडणे पाहून राक्षसीण आता खूपच घाबरली व ते गाव सोडून निघून गेली. अशाप्रकारे, गावाचं रक्षण करणा-या अग्नी देवतेचे पूजन करुन वाईट शक्ती गावातच काय, पण मनातही प्रवेशू नयेत म्हणून होळी पेटवण्याची प्रथा रुढ झाली असावी. बाह्य कृतीपासून आंतरमनापर्यंत सदविचारांचाच वावर असावा, अशी शिकवण देणारी ही होळी!

आणखी एक देवांशी संबंधित असलेली प्रचलित गोष्ट म्हणजे, हिरण्यकश्यपूला होलिका नावाची बहिण होती, जिला अग्नीपासून कुठलाही धोका नसण्याचा वर प्राप्त झालेला. या शक्तीचा दुरुपयोग करुन तिने देवाचे सतत नाम

जपणा-या बाळ प्रल्हादाला जिवंत जाळण्याचा कट रचला. ती धगधगत्या अग्नीत प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन बसली, पण तिच्या अंहकाराने व दृष्ट वृत्तीने तिचाच घात केला व भक्त प्रल्हादाचे अग्नीदेवतेने रक्षण केले. यावरुन, सत्याची साथ देत, वाईट प्रवृत्तींना गिळंकृत करणा-या अग्नीची पूजा करण्याचा विचार होळी सणाला लाभलेला दिसतो.

वाईटावर विजय मिळविण्यासाठी आलेल्या होळीला पुरपोळीचा नैवेद्य दाखवून, तिची मनोभावे पूजा करण्यासाठी गावांमधून उत्साहाने उभारली जाणारी होळी, आता मुंबईतील इमारतीतही साजरी होताना दिसतेय. ज्यामुळे, जीवनशैली बदलली तरी होळीचे तिच्या लोककथांद्वारे शिकवण देणे सुरुच आहे. समाजातील दु:ख पोटात घेऊन, प्रत्येकाच्या जीवनात सुखाचा वसंत येवो हिच पवित्र ‘होळी’ चरणी प्रार्थना!

Image source-https://goo.gl/WLrgQg

More Articles
Designed and Developed by SocioSquares