fatness (1)

“हो, आहे मी जाड त्यात काय?”

वर्गमित्रमैत्रिणींना त्यांच्या जाडेपणावरुन चिडवण्यात कित्येकांचं बालपण गेल आहे. पुढे व्यक्तिंना त्यांच्या शरीरयष्टीवरुन नावं ठेवण्याची ही खोडं मोठं झाल्यानंतरही काही केल्या जात नाही. स्नेही असोत वा नातेवाईक कुणी अंगानं सुटलेलं दिसलं, की अशांचे सल्ले सुरु होतात. व्यायाम कर, चालायला जा, योगा कर, काढा घे, असे एक ना अनेक पर्याय सुचवण्यामागे कधी काळजी दडलेली असते, तर कधी उगाच खिजवण्याची इच्छा! पण यापैकी किती जणं सांगतात, “जमल तर वजन कमी कर, पण स्वत:वर प्रेम करण्यात हलगर्जीपणा करु नकोस. जशी आहेस तशी स्वत:ला स्विकार.”

शरीराबाबत केलेली टिका प्रत्येकाला खिलाडू वृत्तीने घेता येईलच असे नाही. पण, जे आत्मविश्वासाने स्वत:कडे पाहतायत, त्यांना बारीक होणं आवाक्यात नसेल, तर किमान या टिप्पण्यांकडे दुर्लक्ष करणं मात्र जमू शकेल; मन खट्टू होणार नाही.

जाड व्यक्तिबाबत “तोंडावर ताबा नसेल”, हा एक अंदाज ब-याचदा बांधला जातो. तो खरा असेलही, पण नेहमीच नाही. कधी त्या व्यक्तिस थायरॉईड असू शकतो किंवा तत्सम वजन वाढीस निमित्त ठरणारे आजार त्या स्त्रीचं शरीर स्थूल होण्यासाठी कारणीभूत असू शकतात. त्यामुळे, बोलणा-याने विचार करावाच, पण ऐकणा-यानेही फार मनावर न घेता. स्वत:शी म्हणावं, “ही व्यक्ती तर मला माझ्याहून जास्त नाही ओळखत.”

डबल एक्सएल असो नाहितर ट्रिपल एक्सएल, या मापाच्या कपड्यांची दुकानदाकारडे चौकशी करतानाही काही जणींना लाजिरवाणं वाटतं. का व्हावं असं? उलट मोठ्या साईजचे कपडे बनवणारे कित्येक ब्रॅण्ड्स बाजारात घट्ट पाय रोवून उभे आहेत. तितकी मागणी आहे, म्हणून त्यांना पुरवठाही वाढवावा लागतोय. दुकानात स्थूल व्यक्तिंसाठी कपड्यांचे पर्याय ठेवावे लागतायत. तेव्हा, बिनधास्त दुकानात प्रेवश करावा आणि पुन्हा एकदा आत्मविश्वासाने एक्सएल आणि त्यापुढच्य साईजच्या कपड्यांची मागणी करावी.

ट्रेनच्या प्रवासात तुम्ही बसल्यावर न होणा-या फोर सीटमुळे नाराज होण्यापेक्षा सुटसुटीत बसलेल्या इतर दोघींकडे पहा, त्या खूष आहेत. गर्दीत तुमच्या धक्क्याने एखादी बाई वैतागली, तर वाईट न वाटून घेता. त्याच गर्दीत मुलींची छेड काढणा-या पुरुषाशी दोन हात करायला तुम्हीच सक्षम आहात हे  पक्क ध्यानी असू द्या. धष्टपुष्ट देहयष्टीचे असेही फायदे आहेत, वाईट नजर सहजा अशा स्त्रियांच्या वाट्याला जातच नाही आणि इतर बायकाही भारदस्त व्यक्तिमत्त्व पाहून जरा आदरानच वागतात.

स्थूलता ही देखील एक फिगरच तर आहे. पण, आपण तिला स्विकारायला हवं. अतिरिक्त वजन कमी करणं आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. त्यासाठी व्यायाम, डाएटची मदत घेणंही योग्य आहे. पण, एका मर्यादेनंतर जर काही केल्या वजन कमी होत नसेल, तर बारीक होण्यास इतक महत्त्व देऊ नये, की नैराश्य येईल. वजन काट्यावरील भार कमी करण्याच्या नादात, वाढणारा मानसिक ताण दुर्लक्षिला जातो. अशी चूक होऊ नये, म्हणूनच स्वत:वर मनसोक्त प्रेम करायला हवं. कुणी काहीही बोलो. “मी आहे ही अशी आहे, आणि स्वत:ला प्रचंड प्रिय आहे.” या दृष्टिकोनाने स्वत:ला आरशात पहाल, तेव्हा चारचौघात ख-या अर्थाने सुडौल दिसाल.

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares