Banner 01

१४ फेब्रुवारी ‘मोहिम स्त्रियांच्या सुरक्षेची’!

कळत नकळत पाश्चात्य संस्कृती आपल्या परंपरेचा महत्तम भाग बनली आणि तिच्यासाथीने ‘आधुनिक विचारसरणी’ या व्याख्येत सहज जाऊन बसता येऊ लागले. याच पठडीतला ‘व्हॅलेंटाईन डे’ हा परदेशी सण! १४ फेब्रुवारीला साज-या होणा-या प्रेमजल्लोषासोबत, जगभर आणखीही काही खास घडतं. ज्याचा विषय अगदी निराळा, गंभीर व अत्यावश्यक!

स्त्री अत्याचार, हिंसा, लैंगिक छळ, विनयभंग अशा एक ना अनेक विकृतींना क्षणोक्षणी सामोरी जातेय. नेमक्या याच विघातक विचारांच्या विरोधात आवाज उठवणारी मोहिम ‘वन बिलियन रायझिंग’ २०१२ पासून १४ फेब्रुवारी रोजी जगभर राबवली जाऊ लागली. कारण, देश कुठलाही असो विकसित किंवा विकसनशील, कमी जास्त प्रमाणात स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न सर्वत्र समान आहे. महिलांचा कुठलाही वयोगट या दुर्देवी घटनांमधून सुटला नाही आणि या हिंसक प्रवृत्तींना जात, पात, धर्म देखील नाही. अशा, जागतिक समस्या बनलेल्या स्त्री सुरक्षेच्या प्रश्नावर एकत्र आवाज उठविण्याची संधी देते ‘वन बिलियन रायझिंग’ ही मोहिम!

भारतासह एकूण ९९ देश या मोहिमेत सामील झाले असून, त्यामार्फत स्त्री सुरक्षेबाबत जनप्रबोधन करणारे अनेक उपक्रम वर्षभर राबवले जातात. निमित्त व्हॅलेंटाईन डेचे असले, तरी एकत्र जमणा-या जमावात प्रेम, जिव्हाळ्यासोबत स्त्रीयांकडे माणूसकीच्या भावनेने पाहाण्याच्या विचारांची रुजवात व्हावी हे उद्दीष्ट समोर ठेवून, स्त्री सुरक्षेशी संलग्न एखादा विषय दरवर्षी या मोहिमेचा चेहरा बनून समाजासमोर उभा ठाकतो. यंदा ‘वन बिलियन रायझिंग’ ही मोहिम एकजूटीचे आव्हान करतेय.

मुलीच्या पालकांवर तिला योग्य संस्कार देण्याची जबाबदारी, तर मुलाच्या पालकांवर स्त्रीला सन्मानाने वागणूक देणारा पुरुष घडविण्याची जबाबदारी असते. स्त्रियांच्या डोक्यावरील असुरक्षिततेची टांगती तलवार कायमची दूर करायची, तर घराघरातून सदविचारांची पेरण व्हायला हवी, मग निमित्त कुठलेही असो ‘वन बिलियन रायझिंग’ सारखे उपक्रम समाजभान देतात हे नक्की!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares