‘छंद’ म्हणजे फक्त विरंगुळा किंवा टाईमपास नव्हे, तर छंद असतात स्वविकासासाठी! कळत नकळत वयाची मर्यादा झुगारुन लहान व्हायचं, तर हाती आवडीचं काम हवं. तुमचा छंद जर तुमचं करिअर बनलं असेल, तर तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात, नाहीतर कमी काळातच नोकरीचा किंवा रोज रोज तेच काम करण्याचा कंटाळा आल्याची लक्षणे दिसू लागतात. या त्रासातून मानसिक स्वास्थ्य स्थिर ठेवायचे, तर मन आनंदी असायला हवे. गृहिणींना ब-यापैकी फावला वेळ मिळू शकतो. घरातील कामे, मुलांचा अभ्यास किंवा आटोपल्यावर प्रत्येकीने थोडं स्वत:साठी जगायला हवं. कॉलेजला जाणा-या मुली किंवा नोकरी करणा-या महिलांनीही सुट्टीचा दिवस आवडीच्या कामांसाठी राखून ठेवायला हवा.
तुमच्या प्रतिक्रियांद्वारे तुमच्या छंदाविषयी समजले, त्यात खंड पडू देऊ नका. जमल्यास आणखी एखाद्या छंदाची त्यात भर पडली तर उत्तम! काही छंदांचे पर्याय देत आहोत, तुमच्या आवडीनुसार त्यापैकी निवडा. छंद जोपसण्याला वय नसते, चांगल्या सवयींनाही वयाचे बंधन नसते.
- कॅनवास – को-या कॅनवासवर हव्या तशा रेषा मारण्याती मुभा मिळाल्यावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच खूष होतात. लहानपणी तुमची चित्रकला चांगली असो वा नसो, तुम्हाला जर चित्र काढणे आवडत असेल तर आजही पेन्सिल, ब्रश तुम्हाला साथ देतील हे नक्की!
- सिनेमा – तुम्हाला सिनेविश्व आवडते का? त्याविषयी अधिक जाणून घ्यायला किंवा जुने सिनेमे पुन:पुन्हा पाहायलाही आवडतात? तर मग, तुमचा हा छंदही तुम्ही कायम जोपासायला हवा! सिनेमासारख्या कलाकृतीला पूर्ण न्याय द्यायचा, तर सिनेमा थिएटरमध्येच पाहायला हवा हे जरी खरं असलं, तरी कारण वेळेचं असो किंवा आर्थिकतेचं प्रत्येकवेळी थिएटर गाठणं शक्य नसतं. अशावेळी, सिनेमावरील पुस्तके किंवा इंटरनेटचा योग्य पद्धतीने वापर करुन तुम्ही सिनेमा हा छंद जोपासू शकता.
- संगीत – संगीताची आवड असण्यासाठी ‘गाता यायला हवं!’ अशी अट नाही, त्यासाठी संगीताचा मनमुराद आस्वाद घेणारे कानही पुरेसे आहेत. अगदी वयाच्या कुठल्याही दशकात वाद्य वाजवायला शिकता येते. त्यामुळे मनात असेल, तर एखाद्या वाद्याशी मैत्री कराच!
- व्यायाम – व्यायामही छंदाच्या प्रकारात मोडतो, कारण शरीर स्वास्थ्य सांभाळणे गरज असली, तरी प्रथम त्याची आवड असायला हवी! तेव्हा ‘जीम’शिवाय फिट रहाण्याचे इतर नैसर्गिक पर्यायही आहेत. उदा. पोहणे, चालणे, धावणे, बॅटमिंटनसारखे क्रिडा प्रकार!
- स्क्रॅपबुक – कलाकुसर करुन ‘स्क्रॅपबुक’ बनवणे हा लहान मुलांचा खेळ नाही. कुटुंबाचा अल्बम बनविण्यासाठी ही कल्पना उपयोगी ठरेल. मोबाईल किंवा कॅमरामधील फोटोज प्रिंट करुन छापील अल्बम बनवायला हरकत नाही.
- ज्वेलरी मेकींग – खडे, मोती, मणी असे नाजूक साजूक साहित्य वापरुन छान दागिने बनवता येतात. ज्यामध्ये, सध्या क्विलिंगचा ट्रेंड सुरु असून कागदापासून बनवलेले कानातले वजनाला हलके व दिसायलाही मोहक दिसतात.
- फोटोग्राफी – मोबाईलमुळे फोटोग्राफी करणं खूप सोप्पं झालयं. कुठलाही क्षण त्याचक्षणी जपून ठेवण्याची जादू प्रत्येकाला अवगत आहे. मोबाईलला असणारा जास्त मेगापिक्सलचा कॅमेरा वापरुन कुठेही व कधीही फोटोग्राफीचा आनंद घेता येईल व हा छंद अल्बमरुपाने जपूनही ठेवता येईल.
- वस्तूंचा संग्रह – काड्यापेट्या किंवा पोस्टाची तिकीटं जमविण्याचा छंद तुम्ही ऐकून असाल. याला फक्त छोट्यांचा उद्योग समजू नका, कारण जुनी नाणी, नोटा, बिल्ले, शोपीस अशा वस्तू जमविण्याच्या नादातूनच लहान मोठ्या वस्तूसंग्रहालयाची निर्मिती होते आणि पुढील पिढीसाठी माहितीपर ऐवज जमा होतो.
- रोजनिशी – तुम्हाला आठवणी लिहून ठेवायला आवडत असतील, तर नियमित डायरी लिहून तारखेसहीत नोंदी ठेवता येतील. मात्र यासाठी, दररोज दिवसाअंती थोडासा वेळ खास लिखाणासाठी जपून ठेवावा लागेल.
- ग्रुप – शाळेतील किंवा तुमचा कॉलनीती मैत्रिणींचा ग्रुप असेलच! पण तुम्हाला नवनव्या व्यक्तिंना भेटणे, नव्या मैत्रिणी जोडणे हा तुमचा छंद असेल, तर झी मराठी जागृतीचा क्लबमध्ये नक्की सहभागी व्हा! कुटुंबाचा भाग होण्यासाठी झी मराठी जागृतीच्या वेबसाईटवर सबस्राईब करा!
मैत्रिणींनो, फावल्यावेळाचा अचूक वापर करण्यासाठी छंदांची संगत कायम असू द्या! आजचा हा छंदोमयी लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांद्वारे,