Women Marathon (1)

आणि ‘त्या’ मॅरेथॉनमध्ये धावल्या…

प्रत्येक देशाची निराळी ऐतिहासिक पार्श्वभूमी, भौगोलिकतेनुसार तिथले वेगळे राहणीमान, लोकांच्या दिसण्या बोलण्यातील विसंगती, जोपसलेली संस्कृती त्या देशाला त्याचं वेगळं वैशिष्ट्य प्राप्त करुन देते. देशादेशांची तुलना केल्यास विकासाचा व क्रांतिकारक बदलांचा प्रवासही तितकाच कमी जास्त वेगाने घडलेला दिसतो. व्यक्तिंच्या मनातील बदल घडवण्याची तळमळ अनेक चळवळींना जन्म देत गेली, त्यापैकीच आजही अविरत सुरु असणारी स्त्री मुक्तीची चळवळ! समाजातील, घराघरातील स्त्रीला स्वच्छंद जगता यावे, यासाठी अनेक व्यक्ती समूह कायम प्रयत्नशील असलेले दिसतात.

आपल्याला ज्ञानमार्ग बहाल करणा-या फुले दांपत्यांमुळे स्त्रियांना किमान स्वत:च्या अस्तित्त्वाची जाणीव झाली, पुढे आत्मविश्वाने त्या प्रगतीची वाट चाचपडू लागल्या. यामुळे, स्त्री पुरुष विषमतेची धुसर होत चाललेली प्रखरता आपण आता अनुभवतोय. मनाजोगं वावरतो, करिअरसाठी हवे ते क्षेत्र निवडतो, नोकरी करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. आपल्या प्रगतीसोबत आपल्या समोरील अडचणींचा आलेख बदलतोय. तोही विस्तारतोय. तर दुस-या बाजूला चित्र अगदी उलटं आहे. सौदी अरेबियातील महिला, ज्या आजही प्राथमिक पातळीवरच्या समस्यांना तोंड देतायेत. पण कदाचित त्यांचे बंदिस्तपण आता हळूहळू संपुष्टात येईल असे वाटते. तसे उपक्रमच घडलेत! त्यांना नोकरी करण्याची मुभा मिळालीये, त्यांच्यावरील ड्रायव्हिंगचे निर्बंध उठवलेत, तिथे पहिली वहिली महिला मॅरेथॉन स्पर्धा  देखील आयोजित करण्यात आली. पंधरा ते साठ वर्षापर्यंतच्या १५०० स्त्रिया उत्साहाने, धीराने यात सहभागी झाल्या. धावल्या व जिंकल्या.

नियमाप्रमाणे एकच विजेची घोषित केली, तरी त्या सगळ्या जिंकल्यात. कारण त्यातील बहुतेक सा-याजणीच स्पर्धक म्हणून प्रथमच सहभागी झाल्या होत्या. बुरखा, हिजाब, अबाया अशा पारंपारिक पोषाखातच त्या धावल्या. वर्षानुवर्षे आखून दिलेली मूल्ये सांभाळल्यानंतर, त्या देशातील विविध वयोगटातील अनेक स्त्रिया, एकत्र जमल्या मॅरेथॉनच्या निमित्ताने!

काहीतरी नवं करायला मिळाल्याचा आनंद, नेहमीच्या जगण्याहून वेगळं, फक्त स्त्रियांसाठी, तेही खेळ, मॅरेथॉन, इतर देशांसारखं वुमेन स्पेशल आपल्याही देशात घडतयं, बदल होतोय हे समाधान घेऊन त्या मनापासून मनसोक्त धावल्या असतील हे नक्की! सौदी अरेबियातील या परिवर्तनाची जगभर चर्चा घडतेय. कौतुक होतयं. राजकीय, सामाजिक, जातिचे ठोकताळे बाजूला ठेवून फक्त एक स्त्री म्हणून त्या देशातील स्त्रियांकडे पाहूया. तरच, त्यांच्या जगण्यातील या बदलाचे महत्त्व कळेल. अनोळखी देशात का होईना, पण स्त्री जातीची दखल घेतल्याचे समाधान आपल्याला इथे मिळेल.

हा महत्तम बदलाविषयी वाचून, ऐकून तुम्हाला काय वाटले? नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया, लिहा कमेन्टबॉक्सम्ध्ये!

More Articles
Designed and Developed by SocioSquares