स्त्री जीवनातील महत्तम शारीरिक बदल ठरणारी मासिक पाळी त्रासदायक असली, तरी स्त्रीच्या निरोगी आरोग्यासाठी तितकीच आवश्यक आहे. वयाच्या १४ ते १५ व्या वर्षी सुरु होणारे मासिक पाळीचे सत्र, वयाच्या साधारण ४५ ते ५० व्या वर्षी बंद होते. ज्यास ‘रजोनिवृत्ती’ असे म्हटले जाते. स्त्रीचे या प्रक्रियेतून जाणे, तिच्यासोबत तिच्या कुटुंबासाठीही तितकेच अवघड असते.
शारीरिक व मानसिक बदल –
या काळात झोप कमी होणे, डोके जड होणे, छातीत धडधडणे किंवा अंगातोंडावर पुरळ उठणे असे शारीरिक बदल होतात, तर सततची चिडचिड, विनाकारण घरातल्यांवर रागवणे, यातून वादविवाद घडतात. मानसिक बदलांमुळे वागणूकीवर होणारे विपरीत हे परिणाम घरातील सर्वांनाच त्रासदायक ठरतात. या बदलांचा काळ साधारण सहा महिने किंवा वर्षभराचा असतो. यावर उपाय म्हणजे मन स्थिर रहाण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित योगा किंवा व्यायाम करायला हवा.
व्यायाम व योगासने –
व्यायामाचा कंटाळा येत असल्यास किमान सकाळ, संध्याकाळ चालायला जावे. कारण, या काळात स्थूलता वाढण्याची शक्यता असते, जी आटोक्यात ठेवण्यासाठी शरीराची हालचाल होणे गरजेचे आहे. कुठलीही औषधे गोळ्या घेण्यापेक्षा जास्तीतजास्त नैसर्गिकरित्या रजोनिवृत्तीच्या काळात प्रकृती सांभाळायला हवी.
गर्भाशयाचा कर्करोग –
मासिक पाळीतील अनियमितता वयाच्या चाळीशीनंतर स्पष्टपणे जाणवू लागते किंवा अधिकचा रक्तस्त्रावही होतो, असे विरुद्ध परिणाम दिसतात. मासिक पाळी बंद होण्याऐवजी वयाच्या ५० ते ५२ वर्षापर्यंत सुरु रहाते, याच्या विघटीत परिणामांतून स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोगही जडू शकतो. म्हणूनच, कुठल्याही शारीरिक बदलांविषयी चुकूची समजूत न करुन घेता योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
बालपणापासून अनेक शारीरिक बदलांना सामोरे गेल्यावर, जीवनातील सेकंड इनिंगमध्ये प्रवेश करण्याआधी समोर उभा ठाकणारा रजोनिवृत्तीचा काळही स्त्रीयांनी तितक्याच सावधपणे पार करायला हवा. तब्येतीकडे जराही दुर्लक्ष न करता, मुख्यत्वे वयाच्या चाळीशीनंतर वरचेवर आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे व तितकेच आवश्यक आहे, घरातील सर्व सदस्यांनी स्त्रीला मानसिकरित्या समजून घेण्याची!!