महिनाभराचे किराणा भरण्यापासून सणासुदीची खरेदी करण्यापर्यंत प्रत्येक लहानमोठी गोष्ट अगदी चार दुकाने फिरुन चोखंदळपणे विकत घेतो. सध्या सुपरमार्केट किंवा मॉल्समुळे उन्हातान्हात भटकत खरेदी करण्याचा त्रास वाचला आहे. भरपूर ब्रॅंण्ड एकाच ठिकणी, स्वस्त मस्त ऑफर्सची चंगळ आणि भोवताली वातानुकूलित हवा! सार इतकं सोयीस्कर झाल्यामुळे शॉपिंग करण्याच्या दांडग्या उत्साहात वस्तूची सदोषता, त्यावरील वैधतेची तारीख पाहाणे आपण विसरुन जातो. घाईगडबडीत होणारी ही चूक आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते, हे ध्यानात घ्यायला हवे!
बहुदा सर्वच पदार्थ हल्ली हवाबंद पॅकेट्समध्ये मिळतात. रेडी टू कूकसारखे पदार्थ जितके सोयीस्कर, तितकीच त्यांची वैधताही मर्यादित असते. मुख्यत्वे मॉल्समधील सेल किंवा ऑफर्सना भुलून न जाता वस्तूंची एक्सपायरी डेट जाणीवपूर्वक तपासावी. वस्तूची वैधता संपत आल्यावर, ती वस्तू लवकर विकली जावी यासाठी विक्रेते वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढतात. त्यामुळे, एकावर एक मोफत किंवा अर्ध्या किंमतीत मिळणा-या वस्तूंवरील एक्सपायरी डेट पाहायला विसरु नये.
एखाद्या वस्तूवरील वैधता संपल्यावरही, ती विकायला ठेवली असेल. तर लगेचच ही बाब दुकानदाराच्या किंवा मॉलमधील कर्मचा-यांच्या लक्षात आणून द्यावी. वैधता संपलेली वस्तू विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. मॉलमधील कस्टमर केअर विभागाकडे याबाबतची लेखी तक्रार करता येते. तसेच, पॅकेट्सवरील वेस्टनावर त्या त्या कंपन्यांचा ईमेल आयडी, टोल फ्री क्रमांक किंवा पत्ता छापलेला असतो. तिथेही तक्रार नोंदवता येते. त्या वस्तूचे छायाचित्रही सोबत जोडता येईल.
अशा, नियमबाह्य विक्रीवर आळा बसविण्यासाठी कार्यरत असणारा वैध मापनशास्त्र विभाग! इथेही ग्राहक तक्रार नोंदवू शकतो.
नियंत्रक, वैध मापनशास्त्र, प्रशासकीय कुटीर
क्र मांक- ७, फ्री-प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉर्इंट, मुंबई ४०००२१
वस्तू खरेदी करताना मोजलेल्या किंमतीस योग्य न्याय मिळावा, यासाठी कुठलीही टाळाटाळ न करता सुजाणतेने ग्राहकांनी वस्तूच्या वेस्टनावरील एक्सपायरी डेट पाहायलाच हवी. शॉपिंग करण्याच्या नादात ‘घेतली वस्तू टाकली ट्रॉलीत’ असे न करता डोळसपणे वस्तू खरेदी करण्याचा कार्यक्रम पार पाडायला हवा, हेच आरोग्यासाठी हितदायी ठरेल.