अंतरंग मनातले!

जिव्हाळा,प्रेम,आपुलकी,माया यांचं आणि आपलं जणू समीकरणच आहे, नाही का? आपल्या जवळच्यांना काही झालं तरी आपण कासावीस होतो. शेजारी, अनोळखी व्यक्तींना देखील आपण लगेचच आपलंस करतो. आपल्या स्वभावातचं या गोष्टी जन्मतःच असतात. लहानपणी नाही का, भातुकलीच्या खेळामध्ये आपण छोटसं स्वयंपाकघर रचायच.आपल्याच मित्र-मैत्रिणींना जमवून अगदी तासन् तास या भातुकलीमध्ये मन रमुन जायचं. किती अल्लड असतं नाही हे बालपण! तेव्हा वाटतं असतं आपण कधी मोठे होणार? त्यानंतर महत्त्वाचा टप्पा असायचा तो शाळेतला. गृहपाठ,मधली सुट्टी,वेगवेगळ्या स्पर्धा आणि उपक्रम,परीक्षा आणि निकाल यासगळ्याभोवतीच आपलं आयुष्य घट्ट बांधलेलं असायचं. ‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा’ ; खरंच लहानपण प्रत्येकाच्याच आयुष्यातला मौल्यवान भाग असतो. नंतरचा टप्पा कॉलेज जीवन. काय चांगलं, काय वाईट, कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नये हे सगळ समजून घ्यायच ते कॉलेज जीवनात. आपल्या समोरचे प्रश्न,अडचणी यांची गांभीर्यता हे वय शिकवून जातं. आजुबाजूची परिस्थिती,प्रत्यक्ष अनुभव यातून जडणघडण होत असते. शिक्षण झालं कि नोकरी आणि लग्न एकामागोमाग येणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी. ज्यामुळे आपल्या जीवनाला एक वळण मिळतं. पहिला पगार,त्यात मिळणारी बढती,लग्न जमवण्यासाठी घरातल्यांची लगीनघाई हे सगळे दिवस म्हणजे बोटावर रंग ठेऊन फूलपाखरं उडून जावीत असेच असतात. नंतर सुरु होतो तो संसाराचा प्रवास. आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा,आपल्याकडून असलेल्या अपेक्षा,नवीन घर,नवी माणसं आणि जुळलेली नाती, त्यांचे स्वभाव जाणून घेण्यात गंमत असते नाही का ? त्यात आपण नवी नवरी म्हणून होणारे लाड आणि कौतुक या सगळ्याची मजा काही औरच असते. नव्याची नवलाई म्हणतात ती हीच. संसारवेल बहरत असताना चाहूल लागते ती चिमुकल्या पावलांची. बाळासाठी नियोजन, आई होण्याची चाहूल आणि तो संपूर्ण काळ,बाळ जन्मल्यानंतर त्याच संगोपन,मुल मोठं होत असताना त्याचे बोडडे बोल, लाड हे सगळे टप्पे हवाहवेसे वाटतात आणि जगायला उभारी देतात. आपण त्यातला प्रत्येक क्षण खऱ्या अर्थाने जगतो. स्वतः आई झाल्यावर कळतं आईपण कसं निभावलं जातं आणि आपल्या आईची आठवण येऊन ओठावर हसू आणि डोळ्यात आसू येतात अगदी आनंदाने भरून.

मैत्रिणींनो! कधीतरी निवांत बसल्यावर या सगळ्याची आठवण येते. मन पाखरू होऊन अलगद उडत उडत स्वछंदी फिरून येतं अगदी आपल्या नकळत. असे काही आंनददायी क्षण ज्यांच्यावर फक्त आणि फक्त आपलाच हक्क असतो. आयुष्याचा प्रत्येक टप्प्या नवा अनुभव देणारा, सुखदुःखाच्या ऊनसावली मधून हसत खेळत आपल्या मनातले अंतरंग उलगडणारा असतो. तेव्हा हे अंतरंग हळूवार उलगडा आणि मनमुराद जगा!

Designed and Developed by SocioSquares