photo frame banner

‘आठवणी’ जपण्यासाठी तत्पर!

व्यक्तिच्या जन्मापासून त्याच्या स्मरणशक्तीच्या विकासासोबत हळूहळू जीवनात घडणा-या घटना, प्रसंग, व्यक्तिंसोबतचे संवाद, सारे आठवणींच्या कप्प्यात साठवले जाऊ लागले. मानसशास्त्र या आठवणींचे अनंत प्रकार मांडत असले, तरी सामान्यत: आनंदाच्या क्षणांना जपून ठेवावे या मुख्य भावनेने त्या आनंदी प्रसंगांचे वर्णन किंवा रोजनिशीच्या माध्यमातून त्यांच्या तारीखवार नोंदी करुन ठेवण्याचा पायंडा पडला. सुखद क्षण दिर्घकाळ स्मरणात राहावेत यासाठी ते असे लिहून ठेवण्याची पद्धत फार जुनी होत जाऊन, आता कालबाह्य झाली. यामागील महत्त्वाचे कारण, कॅमेराच्या जगात काल्पनिक वाटावे असे टप्प्याटप्प्याने घडलेले आविष्कार!

तंत्रज्ञानाच्या दुनियेने साठवणूकीचे भरपूर पर्याय उपलब्ध करुन दिले व ‘आठवणी’ हा मानवी जीवनातील महत्त्वाचा ऋणानुबंध जपण्याची जबाबदारी तंत्रज्ञानाकडे मोठ्या विश्वासाने सोपवली गेली, ते मुख्यत्वे कॅमेराच्या शोधानंतर! याच कॅमेरामुळे भूतकाळात घडलेले क्षण छायाचित्रांच्या साहाय्याने जपून ठेवू लागलो आणि या छायाचित्रांचा संग्रह म्हणजे, फोटो अल्बम पाहून कुटुंबातील पिढ्या आपल्या पूर्वजांची ओळख करुन घेऊ लागल्या. काढलेल्या एका फोटोची प्रत मिळण्यासाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागे आणि आता काही सेकदांत जगाच्या कानाकोप-यात फोटो पाठवता येतो. यामुळे, आनंदाचे अनंत क्षण जपता येतात सोबत जगाच्या पाठीवर कुठेही तो फोटो पाठवून क्षणार्धात इतरांनाही त्यामध्ये सहभागी करुन घेता येते, अगदी सहज!

मोबाईल फोनमध्ये कॅमेराची सुविधा उपलब्ध झाली आणि स्मार्ट फोनमुळे उत्तम प्रतिचा कॅमेरा सतत सोबत असणे सवयीचे झाले. मैत्रिणींनो! आपण या सुविधेचा पुरेपूर फायदा करुन घ्यायलाच हवा. काढलेले फोटोज फोन अचानक बिघडल्यामुळे नाहिसे होतात आणि आठवणी जपणा-या फोटोजना कायमचे मुकावे लागते. ही समस्या टाळण्यासाठी खालील पर्याय उपयुक्त ठरतील,

१. फोटो प्रिंट काढून त्यांचा घरच्याघरी अल्बम तयार करणे, एक उत्तम पर्याय आहे.
२. मोबाईलमधील फोटोज लॅपटॉप किंवा कॉम्पुटरमध्ये साठवून ठेवावेत.
३. प्रत्येक सण सोहळ्यानुसार फोटोजचे गट करुन त्याची सीडी बनवावी, जेणेकरुन ते संग्रही ठेवणे सोप्पे जाईल.
४. तुम्ही स्वत:च्या किंवा नातेवाईकांच्या ईमेल आयडीवर मोबाईलमधील फोटोज पाठवू शकता, ज्यामुळे तुमच्याजवळील फोटोज त्यांच्याकडेही साठवले जातील.
५. ड्रॉपबॉक्स सारख्या पर्यायाचा वापर करुन इंटरनेटच्या माध्यमांतून आठवणींचा संग्रह कायमचा जपून ठेवता येईल.

अशाप्रकारे, ‘आनंदी क्षण’ जपण्यासाठी सुरु असलेली धडपड ख-या अर्थाने यशस्वी होईल व येणा-या पुढील पिढीसाठी आठवणींचा भरपूर साठा उपलब्ध असेल, ज्यामुळे तुम्ही त्यांना भूतकाळाची रंजक सफर घडवू शकता!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares