khajur banner

आरोग्यदायी पदार्थांचा ‘हिवाळा’!

थंडीचे दिवस म्हणजे खवय्यांची चंगळ!! थंड वातावरणात भूक खूप लागते त्यामुळे, पदार्थांच्या विविधतेचा आनंद घेण्यासाठी स्वयंपाकघरात नवनव्या पदार्थांच्या रेसिपीज करुन पाहाण्याचे बेत आखले जातात. ज्यामध्ये, पौष्टिक सत्त्व असतील सोबत तो पदार्थ तितकाच चविष्टही असेल! या ब्लॉगमध्ये दिलेल्या पुढील रेसिपीज नेमक्या याच गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत,

शेंगदाण्याचा लाडू –

साहित्य – २५० ग्रॅम शेंगदाणे, २५० ग्रॅम साखर, अर्धा नारळ, ५-६ वेलदोड्यांची पूड, थोडा केशरी रंग, पाव वाटी तूप

पाककृती – दाणे भाजून सोलावेत व त्यांची जाडसर पूड करावी नंतर, थोड्या तूपावर दाण्याचा कूट भाजून घ्यावा. खोब-याचा किस नुसताच परतून घ्यावा. साखरेत पाणी घालून दोनतारीपेक्षा जरा जास्त पाक करुन, त्यामध्ये दाण्याचा कूट, खोबरे, वेलदोड्याची पूड घालून नीट ढवळून घ्यावे व मिश्रण निवले की त्याचे लाडू वळावेत.

खजुराची बर्फी –

साहित्य – २०० ग्रॅम बिनबियांचा खजूर, अर्धा नारळ, १ वाटी साखर, अर्धी वाटी दूध, ४-५ वेलदोड्यांची पूड, २५ ग्रॅम काजू

पाककृती – थोड्या काजूचे काप करुन घ्यावेत, उरलेल्या काजूची जाडसर पूड करावी. नंतर, खजूर, खोबरे, दूध, साखर व काजू पूड एकत्र करुन गॅसवर ठेवावी. मिश्रण घट्टसर होत आले की वेलदोड्याची पूड घालावी. मिश्रण घट्ट झाल्यावर तूप लावलेल्या थाळीवर थापून त्यावर काजूचे कापलेले काप पसरावेत व मिश्रण गार झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात.

टॉमेटो सूप –

साहित्य – १ किलो टॉमेटो, अर्धी वाटी साखर, १ चमचा मीठ, अर्धा चमचा काळीमिरी, ब्रेडचे छोटे तुकडे

पाककृती – प्रथम टॉमेटो पाण्यात उकळवून घ्यावीत, त्यामधील पाणी सुकल्यावर सुईच्या साहाय्याने त्यास छेदावे. छेदल्यानंतर टॉमेटो गाळून घ्यावेत त्यामध्ये, मीठ, काळीमिरी, साखर मिसळून कमी गॅसवर शिजविण्यास ठेवून द्यावे. साधारण, १५ मिनिटानंतर गॅस बंद करावा व त्यावर तळलेल्या ब्रेडचे तुकडे टाकून सूप सर्व्ह करावे.

डिंकाचे लाडू –

साहित्य – बारीक डिंक अर्धा किलो, खारीक पाव किलो, आळीव पाव किलो, खसखस पाव किलो, सुके खोबरे १ किलो, गूळ, साजूक तूप, बदामगर, वेलची पूड, जायफळ पूड.

पाककृती – प्रथम डिंक तूपात फुलवून खलबत्यात कुटून घ्यावा. अळीव देखील थोड्या तूपात भाजावेत.  खसखस, खारीक, सुके खोबरे भाजून घ्यावे. खमंगपणा येण्यासाठी खसखस आणि खारीक मिक्सरमध्ये जराशी बारीक करुन घ्यावी व हे सर्व मिश्रण एकत्र करावे. त्यामध्ये बदामगर, वेलची, जायफळ पूड घालावी. लाडू करतेवेळी जेवढे मिश्रण असेल त्याच्या निम्मा गूळ घेऊन गोळीबंद पाक करावा. पाक गॅसवरुन खाली उतरवून त्यामध्ये तयार केलेले सारण घालावे व चांगले ढवळून भराभर लाडू करावेत.

वरील, पदार्थ शरीरासाठी पौष्टिक व आरोग्यदायी आहेत तसेच, थंडी कमी झाली असे वाटू लागले, तरी मुख्यत्वे वयस्कर व्यक्तिंना गारव्यामुळे दिर्घकाळ थंडीचा त्रास जाणवतो, म्हणूनच थंडीमध्ये शरीरातील उष्म्याचे संतुलन राखण्यासाठी घरातील सर्व सदस्यांनी या पदार्थांचे सेवन करायला हवे.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares