तुम्हीही अनुभवलं असेल, लहान मुलांना एखादी गोष्ट ‘नको करुस’ म्हटलं, की ते मुद्दाम पुन:पुन्हा तेच करुन दाखवतात. हा गुण प्रत्येकात उपजतच असतो. लहानग्यांना नकाराच्या विरुद्ध वागण्यात गंमत वाटते आणि मोठ्यांचा मात्र त्रागा होतो. पालक मुलांमध्ये वादाच्या ठिणग्या उडू लागतात, ते याच कारणांवरुन.
मुलांना आणखी खेळायचं असतं आणि पालक म्हणतात, “पुरे झालं आता अभ्यास करं.” एखादं खेळणं हवं असतं, काही कारणास्तव पालक त्यास लगेचच ते घेऊन देऊ शकत नाहीत. यापलिकडे छोट्यांना चांगल्या सवयी लावण्याचं महाकठीण कामाचाही या यादीत समावेश होतो. ताटाभोवती अन्नाचे कण न सांडता जेवण्याची सवय, मोठ्यांचा आदर करणे, टिव्ही, मोबाईल सारख्या यंत्रांचा अतिवापर टाळणे या व अशा कित्येक बाबी पालक मुलांच्या नात्याआड सारख्या डोकावत राहतात.
लहान मुलांच्या “हो” ला “हो” म्हणणे हा यावरील उपाय बिलकूल नाही. पण मग छोट्यांचे मन दुखावत तुमचे विचार त्यांना पटवून द्यायचे असतील तर पुढील मार्ग अवलंबवावे लागतील.
- यांत्रिक मित्रमंडळी :-
हल्ली सर्वच पालकांसमोर उभा ठाकलेला यक्ष प्रश्न म्हणजे, मोबाईल, टॅब, लॅपटॉप, टिव्हीच्या अतिवापरापासून बच्चेकंपनीला दूर कसे ठेवायचे? व्हिडीओ गेम्स, गाणी, चित्रपटांचं नकोत्या वयात लागलेलं वेड त्यांच्या डोक्यातून घालवायचं असेल, तर अभ्यासापलिकडे इतर कलांशी त्यांची ओळख व्हायला हवी. शाळा, ट्युशन्स व्यतिरिक्त त्यांना आवडेल अशा कलेचे शिक्षण त्यांना घेऊ द्यावे. ज्यामुळे, ते स्वखुशीने व्सस्त राहतील.
मिळेत तिथे मोकळ्या जागेत मैदानी खेळांचा डाव मांडणारी लहानगे हल्ली फारसे दिसत नाही. पालकांनी स्वत:च्या कामातून थोडा वेळ राखीव ठेवून, आठवड्यातून किमान एकदातरी त्यांना खुल्या मैदानात, बागेत खेळायला घेऊन जावे आणि ते एकटे असतानाही खेळू शकतील असे बैठे खेळही त्यांना शिकवावेत.
- मग, योग्य काय? :-
संस्कारांचं दडपण येतं, त्यामानाने चांगल्या सवयींशी मैत्री करणं सोप्प वाटतं. म्हणूनच, सद्गुणांची पेरण करताना “तू हे का करु नकोस किंवा हे का कर” हा फरक प्रत्येकवेळी आपल्या पाल्यास समजावून सांगायला हवा. फक्त नियमावली मांडून मोकळे होऊ नये.
- तोडीसतोड पर्याय :-
छोट्यांना मोबाईल न वापरण्याचे सांगताना, त्याचवेळी त्याला योग्यसी पर्याय वस्तूही त्यांना सूचवावी. उदा. गप्पा गोष्टी, कोडी, चित्रकलेची, गोष्टीची पुस्तकं, बैठे खेळ त्यांना देता येतील. सोबत तुम्हीही त्यांच्यासोबत थोडा वेळ मजेत घालवलात, की तेही खूष!
मुलं घरकोंबडी होतात, कारण त्यांना घराबाहेर फिरायला घेऊन जाणारं कुणी नसतं. आई वडील दोघंही कामात व्यस्त असतात. तसेच, मुलं मोबाईलवर गेम खेळण्यात तासनतास सहज घालवतात, कारण त्यांच्या प्रतिक्रियेला तिथे कुणीतरी प्रतिसाद देत असतं. जे त्यांना मनापासून आवडतं. हीच भूमिका पालकांनी बजावली तर? तुम्ही त्यांच्यासोबत खेळलात, गप्पा मारल्यात तर? मान्य फार वेळ नसतो हल्लीच्या पालकांकडे, पण मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पैशाहून महत्त्वाची आहे हीच मौल्यवान वेळ. पालक-पाल्यात नियमित संवाद घडत राहीला, की ‘नाही’, ‘नको’, म्हणणं पालकांना फार कठीण जाणार नाही, पाल्यही छान समजून घेईल ते!
पाहा विचार करुन, कळवा तुमचे मत! आतुरतेने वाट पाहतोय तुमच्या प्रतिक्रियांची…