WAD (1)

तुम्ही काय निवडाल?

पतीला उत्तम आरोग्य, दिर्घायुष्य लाभावे म्हणून मोठ्या श्रद्धेने पत्नी वटपौर्णिमेचे व्रत करते. या व्रताशी निगडीत सावित्री सत्यवानाची पौराणिक कथा आपणास ठाऊक असेल, यात शंकाच नाही. सावित्री जिद्दी, निश्चयी व चतूर होती तशाच आहेत की आधुनिक काळातील सावित्री हूशार आणि आत्मनिर्भर!

घर सांभाळून नोकरी करताना त्यांना रुढी परंपरांचा विसर पडलेला नाही. वेळातवेळ काढून कधी साग्रसंगीत तर कधी चोरवाटा धुंडाळत जमेल तसं ती सणवार साजरे करते. जसं की, दिवाळीचा थोडा फराळ घरी बनवायचा,तर थोडा विकत आणायचा, तिळगूळ विकत आणले, तरी गूळपोळी घरीच बनवायची. गणेशोत्सवासाठी मखर आयता आणताना, मोदक मात्र घरची सुगरण स्वत: बनवते. यामुळे, जो काही  थोडा बहुत वेळ वाचतो, त्यात इतर कामे निपटता येतात.

वटपौर्णिमेतही गेली कित्येत हा वेळ वाचवण्याचा किंवा वडाच्या पूजेबाबत शॉर्टकटचा फंडा वापरला जातोय. आधीच छोटे कुटुंब, सुखी कुटुंब पद्धती फोफावल्याने बायका घोळक्याने वडाची पूजा करायला जातानाचे चित्र दुर्मिळ झालेय. त्यात झाडांची तोड वाटेल तशी तोड होत असल्याने क्वचित वड नजरेस पडतो. यावर, उपाय म्हणून बायका घरच्याघरीच वडाच्या फांदीची पूजा करणे पसंत करतात. गेली कित्येक दशके पर्यावरण प्रेमी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतायत;  “नका रे तोडू फांदी, त्यापेक्षा वड लावा, तो जपा.” खरेतर हीच पती, कुटुंबा वा संपूर्ण जीवसृष्टीसाठी जीवनदायी बाब ठरेल. पण जागेअभावी वडाचे रोपटे जमत नसेल, तर बोनसाय वड आयता विकत घेता येईल किंवा वडाचं रोप घरीच बोनसाय प्रकारे जगवता येईल.

नर्सरीमध्ये विकत मिळणार बोनसाय झाडं तशी महाग असल्यानं प्रत्येकाला एक स्वतंत्र झाड विकत घेणं शक्य नसतं. पण, पाच – सहा मैत्रिणी मिळून एक झाड विकत घेऊ शकतात. वर्षातून एकदा त्याची पूजा केली जाते. पण, ते वर्षभर ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा करतच. बोनसाय जातीचं असल्यानं फार जागाही व्यापत नाही. गॅलरी वा बाल्कनीत सहज सामावतं. याहून पलिकडे थोडी अधिकची मेहनत घ्याची तयारी असेल, तर तुम्ही घरीच वडाचं खुजं रुप तयार करु शकता. इंटरनेट किंवा बागायतीच्या पुस्तकांमध्ये बोनसायीकरण कसं करावं याची माहिती तुम्हाला हमखास मिळेल.

करणार ना विचार, या नव्याको-या पर्यायाचा? जरुर कळवा तुमच्या प्रतिक्रिया खालील comment box मध्ये! यंदा प्रतिज्ञाच करु, वडाच्या फांदीची पूजा न करण्याची. थेट वड गाठायचा किंवा मग बोनसाय रुपी वडाची घरी पूजा करायची. कारण, निसर्गाची जपणूक ही फक्त सातच नाही, तर जन्मोजन्मीची प्रेरणा ठरणार आहे. दिर्घायुष्य प्रत्येकाला लाभो, निसर्गासमवेत प्रत्येकक्षण सुखी होवो, हीच मनोमन प्रार्थना!

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares