नेलपेन्ट जितकं काळजीपूर्वक लावावं लागतं, त्याहून अधिक ते लावून झाल्यावर सुकेस्तोवर सांभाळावं लागतं. जरासं दुर्लक्ष झालं, तरी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! ओल्या नेलपेन्टवर नकळत आपल्याच बोटांचा ठसा उमटला किंना बारीक रेख जरी उठली तरी कसनुसं होतं. ह्या शक्यता टाळण्यासाठी काही वेळ कुठलीही हालचाल न करता नेलपेन्ट सुकण्याची वाट पाहात बसावं लागतं. त्यात जर कधी घाईत असू, तर ऐनवेळी नेलपेन्ट लावून ते झटपट सुकवणं म्हणजे मोठं दिव्यच, अशावेळी तयार व्हावं, की नेलपेन्ट सुकवत बसावं..? मोठ्या मेहनतीनं लावलेलं नेलपेन्ट काही मिनिटांत सुकवून देणा-या कल्पक युक्त्या इथेच तर कामी येणार आहेत.
- कुकिंग स्प्रेचा वापर करुन नेलपेन्ट सुकवता येतं, यावर खरतर विश्वास बसणं कठीण आहे. मात्र, ही युक्ती जरुर पडताळून पाहा. नेलपेन्ट लावलेल्या बोटांवर कुकिंग स्प्रे हलकेच फवारावा. ५ ते ६ मिनिटे बोटे तशीच ठेवावीत व नंतर साबणाच्या साहाय्याने हात स्वच्छ धुवून घ्यावा. या स्प्रे ऐवजी, बेबी ऑईल देखील वापरता येईल.
- कामं आयत्यावेळी करण्याच्या सवयीतून नेलपॉलिश लावण्याचं काम तरी कसं सुटेल? तेव्हा, बाजारात उपलब्ध असणा-या झटपट सुकणा-या नेलपेन्ट वापरणं उपयुक्त ठरेल. अशी नेलपेंन्ट सुकायला फार वेळ लावत नाहीत. कुठलेही जास्तीचे प्रयत्न न करता, अवघ्या काही मिनिटांत हे नेलपेन्ट सुकतात.
- नेलपॉलिशचा एक कोट लावण्यापेक्षा डबल कोट लावणं सुंदर दिसत असलं किंवा अधिक काळ टिकून राहत असलं, तरी घाईगडबडीत असताना नेलपॉलिश पटकन सुकावं म्हणून थोडा कामचलाऊपणा करायला काय हरकत आहे? अशावेळी, नेलपॉलिशचा एक पातळ कोट लावणे सोयीचे ठरते.
- बोटं गार पाण्यात बुडवून ठेवण्याची युक्ती कदाचित तुम्हाला ठाऊक असेल किंवा तुम्ही वापरुनही पाहिली असेल; मात्र त्याहीपेक्षा कमी वेळात नेलपेन्ट सुकवायचं असेल तर थेट फ्रिजरची मदत घ्यावी लागते. यासाठी पंजा काही मिनिटे फ्रिजरमधील बर्फावर ठेवावा. नेलपेन्ट अवघ्या काही मिनिटांत सुकेल. फ्रिजचं दार बराचवेळं उघडून उभं राहिल्यानं, आई ओरडू शकते; तेव्हा जरा सांभाळून!
- वरील कुठलाच पर्याय वापरावा लागणार नाही, जर तुमच्याकडे युव्ही किंवा एलईडी लाईट्स असणारं नेल ड्रायर असेल. आकाराने लहान असणारं हे ड्रायर, कुठेही सहज कॅरी करता येत. परवडणा-या दरात असल्याने घरात एक नेल ड्रायर असणं सोयीचं ठरतं.
काय मग, आता नेलपेन्ट सुकवणं तापदायक वाटणार नाही ना..? रोजच्या धावपळीत फुंक मारुन नेलपेन्ट सुकवायला वेळ कुणाकडे आहे? त्यापेक्षा वरीलपैकी शक्य असेल ती युक्ती वापरा, आणि काही क्षणांत नेलपेन्ट सुकवा.