amruta articles

तूच समुद्र.. तूच किनारा..

झी मराठी जागृतीने आजवर अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध ठिकाणी जाऊन अनेक महिलांशी संवाद साधण्याचं काम केलंय. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील विविध शहरांतील आणि गावांतील महिला जागृतीशी जोडल्या गेल्या. याशिवाय वेबसाईट, फेसबुकच्या जागृतीने या महिलांशी आपला संवाद सुरुच ठेवला. यामध्ये कधी रोजच्या जीवनातील गोष्टींबद्दलच्या टिप्स होत्या, कधी आरोग्यविषयक सल्ले होते तर कधी आत्मसंरक्षणाचे धडेही होते. या सा-याला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळतोच आहे. संवादाची हीच साखळी पुढे नेत आता जागृतीने आणला आहे हा खास कॉलम ज्याद्वारे विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी आपले काही अनुभव कथन करत तुमच्याशी संवाद साधणार आहेत. ज्याची सुरुवात आपण करतोय जागृतीची ब्रॅंड अम्बॅसेडर असलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष हिच्या लेखाद्वारे.

झी मराठीची अवघाची संसार ही मालिका करत असतानाच पहिल्यांदाच मी आयुष्यात स्वतःचीच आणि कुणाचीच साथ नसलेल्या अनेक बायकांना भेटले. त्या मालिकेतील माझी व्यक्तिरेखा ही नव-याचा मार सहन करणा-या बायकोची असल्याने तसाच त्रास सहन करणा-या अनेक बायका मला आवर्जून भेटायच्या, त्यांचा त्रास सांगायच्या. या पार्श्वभूमीवर जेव्हा झी मराठीने जागृतीची संकल्पना माझ्यासमोर मांडली तेव्हा खूप हायसं वाटलं. ती संकल्पना जसजशी आकार घेत गेली तसतसे आम्ही कार्यक्रम करत अनेक ठिकाणी बायकांना भेटत गेलो. प्रत्येक कार्यक्रमात जागृतीच्या टीमने अभ्यास करुन त्या भागातील अशी एक पाहूणी स्त्री आमंत्रीत केली जी तिच्या दुःखाच्या, एकटेपणाच्या पलिकडे जाऊन स्वतःचा हात स्वतःच हातात घेऊन खंबिरपणे उभी आहे. तिने हिंमतीने तिचं तिचं एक क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात मनापासून काम केलं आहे. मग ते काम कुठलंही असो.

जशा स्वतःला खंबीरपणे साथ देणा-या खूप जणी भेटल्या तशाच स्वतःकडे कित्येक वर्षात काहीही लक्ष न देऊ शकलेल्या, समोरच्याला जाणिव नसतानाही आयुष्यभर त्याचासाठी खस्ता खाऊन विझून गेलेल्याही अनेकजणी भेटल्या. त्या वेगवेगळ्या वयाच्या होत्या. एक नऊ महिन्याची गर्भवती बाई मला येऊन बॅक स्टेजला भेटली. म्हणाली भूक लागते पण सासू पुरेसं खायलाच देत नाही. म्हणते इतकी कशी खातेस? एक वयस्कर आजी अशीच बॅक स्टेजला येऊन म्हणाली आयुष्यभर पोरांसाठी झटले आता सून नातवंडांचं काहीच बघत नाही. त्यांचही मलाच बघावं लागतं. दमले गं आता, नाही होत आता. हे आमच्या मुला सुनांना कळायला नको का? यातून वाटलं ‘अवघाची..’ च्या वेळी भेटलेल्या बायकांना त्यांचे नवरे मारत होते. ही एक दिसणारी पण अनेक नात्यांत एक न दिसणारी हिंसाही असते. या हिंसेचा जन्म कुठुन होत आहे? या गोष्टीचा विचार करतांना मी जागृतीच्या ब्रीद वाक्यापाशी आले. ‘साथ स्वतःला स्वतःची’… ही साथ नसल्यानेच ही हिंसा जन्मत असेल का? कित्येक घरात नव-याची बायकोला साथ नसते मग बायको तिचं सर्वस्व तिच्या मुलांत बघायला लागते. तिची राहिलेली स्वप्नं, तिची व्यक्त न झालेली दुःखे या सगळ्याला ती तिच्या मुलांशी वाटून घ्यायला लागते. कधी कधी मग हे सगळं प्रेम, साथ या शब्दांच्या आवाक्यापलिकडे जायला लागतं. साथीपलीकडे दुस-या माणसांवर अवलंबून रहात रहात शेवटी त्याच्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही अशा वाटण्यामुळे ही हिंसा जन्म घेत असावी का? आपल्यातल्या समुद्राला दुस-यामध्ये किनारा शोधण्याची ही धडपड आसपासच्या कितीतरी नात्यांना केविलवाणं करताना मी पाहते आहे. माझ्या स्वतःतही हे होताना मी पाहिलं. यातून माझ्या नव-याच्या म्हणजेच संदेशच्या वाट्याचे नसलेले काही राग जेव्हा मी तो केवळ माझा साथीदार आहे म्हणून त्याच्यावर निघताना पाहिले तेव्हा मी सावध झाले. सुदैवाने ते सगळं उघड्या डोळ्यांनी सजगपणे पाहून मला स्वतःला त्या दृष्टीने सुधारणा करण्यासाठी काय उपचार करता येईल याचा विचार करताना मानसोपचाराची शांत आश्वासक मदत मिळाली. त्यातून आम्ही दोघं आमच्या पुरती आमच्या साथीची वेगळी व्याख्या शोधण्याच्या वाटेवर जाऊ शकलो. त्यातून आपलं ओझं दुस-यावर टाकणं म्हणजे साथ नाही हे उमगतं आहे. एखाद्या कारणाने माझा दिवस वाईट गेला असेल तर त्याचं खापर फोडायची जागा म्हणजे माझा साथीदार नाही. कुठलंच खापर कुठेतरी कशाला फोडायला हवं? आपलं दुःख, आपला राग, आपली असूया, आपली अपुरी स्वप्न, आपला एकटेपणा हे सगळं वाटतं तेवढं भीतीदायक नाही हे समजत जात आहे. हे सगळं आपलं आपण निगुतीने आपल्या आत गोळा करु शकतो. आपल्या प्रत्येक प्रश्नाची समजुत घालण्याची ताकद आपल्याच आत आहे हे उमगतं आहे. पण आधी तो प्रश्न आपल्या आतला आहे आणि त्याचं उत्तर शोधण्याची जबाबदारी माझ्या जोडीदाराची, मुलाची, मुलीची इतर कुणाचीही नाही तर माझी आहे हे समजायला हवं. नाहीतर काही वेळा आपल्या प्रश्नांच्या ओझ्याने गुदमरुन आसपासच्यांना काही जीवघेणी पाऊलं उचलावीशी वाटतात.
एक आई आपली अपूर्ण स्वप्न मुलांत पाहते. पाहते पाहते इतकी पाहते की त्याची स्वप्नं, त्याचं आयुष्य त्याचं राहत नाही. तो गुदमरतो, तिचं स्वप्न आपलंसं करण्याच्या धडपडीत अपयशी होऊन स्वतःचं आयुष्यच संपवून टाकतो. नुकतंच एका भूमिकेच्या निमित्ताने अशीही आई साकारायला मिळाली आणि पुन्हा एकदा वाटलं, त्या आईकडे तिच्या अपेक्षांचा समुद्र आपला आपण पेलायची ताकद असती तर? खरं तर, ती प्रत्येकातच असते पण तिथपर्यंत प्रत्येकजण पोहचू शकला तर. जागृतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशा कित्येक जणी भेटल्यात ज्या तिथे पोहचू शकल्यात. एका लोकल अपघातात मोनिका मोरेला तिचे हात गमवावे लागले. त्यानंतर ती ‘उंच माझा झोका पुरस्कारा’च्या मंचावर पुरस्कार घेताना जेव्हा भेटली तेव्हाचं तिचं भाषण विसरता येत नाही. तिला अपघात झाला तेव्हा तिला मदत करायची सोडून जमलेले लोक तिचे मोबाईलवर फोटो काढत राहिले. त्या रागातून बाहेर पडून ती आज कृत्रीम हाताने स्वतःचं आयुष्य सावरते आहे. या सगळ्यानंतर मलाच असं का व्हावं या प्रश्नापलिकडे जाऊन मला माझं आयुष्य खूप आवडतं असं निखळ हसत ती सांगू शकते. माझी मैत्रिण सोनाली नवांगुळ एका अपघातात तिचं कमरेखालचं शरीर निकामी झालं. ती कोल्हापुरात एकटी राहते. तिच्या घरी गेलं की व्हिलचेअरवरुन झरझर फिरत गरमागरम पोहे बनवून स्वतः आणून देते. ती आणि तिचा कॅथेटर या विषयावरचं तिचं चिंतन मला स्तिमित करतं. कधी तरी सकाळी फोन करुन म्हणते, आज सकाळपासून फार आनंदात आहे. उगीचंच गं.. म्हणजे आपल्या सगळ्या अंगाला फुलं आली तर कसं वाटतं ना तसं वाटतंय.. मोनिका, सोनालीसारख्या किती तरी जणी आपल्या आतल्या समुद्राचा किनारा स्वतःच होऊन आत्मविश्वासाने उभ्या आहेत. त्यांच्यामुळे ग्रेसांच्या काही ओळींचा अर्थ माझ्यापुरता नव्याने उमगतो आहे.

पुसा बाहुलीचे डोळे

वेचा आभाळात मोती

उण्या पायाच्या नादाने

दिशा कोसळून जाती.

बाहुली म्हणजे जर आपली कुडी असेल तर तिचे डोळे आपले आपण पुसायचे. ती रडत असताना सुद्धा आपल्यात आकाशातल्या मोत्यांना वेचायची जिवनेच्छा, उर्मी जागवायची आहे. मोनिका, सोनालीसारख्या अनेकींच्या जगण्याच्या स्पंदनांनी माझ्यातल्या कित्येक भित्यांच्या भिंती कोसळून पडत आहेत.

असेच काहीसे अनुभव तुमच्याकडेही असतील तर किंवा या लेखाबद्दल तुमचं काही मत असेल तर तुम्हीही सहभागी होऊ शकता आमच्या खास जागृती संवादात.

Comments
Popular Posts
दही वडे (1)
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquare