swatahamadhlya

स्वतःमधल्या ‘स्व’ चा शोध !

८ मार्च हा दिवस आपण महिला दिन म्हणून साजरा करतो. या दिवसाला खरा अर्थ प्राप्त करण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्या स्त्रियांची आहे आणि ती आपण सक्षमपणे निभावत आहोत. उंबरठ्याच्या अलीकडे आणि पलीकडे आपल्यातली प्रत्येक मैत्रीण स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढतेय आणि झटतेय. आपली आवड, छंद , शिक्षण , नोकरी या सगळ्याच बाजूंनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपल्या खऱ्या अस्तित्वाचा शोध ती स्वतः घेते आहे आणि समाजाला देखील करून देते आहे .

स्त्री कर्तुत्त्वाने पुरुषसत्ताक संस्कृतीला छेद दिला आहे आणि त्याला कोणताही अपवाद नाही हे विशेष. आजुबाजूची परिस्थिती आणि स्त्रियांबद्दलची मानसिकता संमिश्र आहे हे आपण जाणतोच म्हणजे एकिकडे स्त्रियांच्या पुढारलेपणाची उदाहरणे आहेत तर दुसरीकडे स्त्रियांबद्दलची उदासीनता देखील आहे. हीच उदासीनता संपुष्टात आणण्यासाठी आपण आपल्याला परीने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. जसं एका मशालीने अनेक मशाली पेटत जातात अगदी तसच आधी स्वतःला प्रत्येक बाबतीत शिक्षित आणि जागरूक करण्याकडे सकारात्मक पाऊल टाकणे आवश्यक आहे आणि त्यातून इतरही आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांना पुढे घेऊन जाण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. या वेबसाईटच्या माध्यमातून ‘झी मराठी जागृती’ नेहमीच प्रयत्नशील राहील यात शंका नाही किंबहुना स्वतःमधल्या ‘स्व’ चा शोध घेण्यासाठीच हे माध्यम तुम्हाला नेहमी प्रोत्साहन देईल; पण त्यासाठी प्रत्येकीने हातात हात घालून सज्ज झाले पाहिजे.

स्त्रियांप्रती असलेली समाजाची मानसिकता बदलवण्यासाठी आणि सबलता घडवण्यासाठी प्रत्येकीने स्वतःचा शोध घेणे आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला आज कितीतरी महिला आहेत ज्यांना व्यावहारिक जगाचा तितकासा गंध नाही. त्यांचे बोट धरून त्यांना वाट दाखवण्याची इच्छा आणि त्यासाठी उचललेले एक छोटेसे पाऊल महिला दिन या दिवसाला नवा अर्थ बहाल करून देऊ शकेल हे मात्र खरं. ‘आम्ही सारे खवय्ये जागृती विशेष भागात येणाऱ्या मैत्रिणी त्यातलीच आदर्श उदाहरणे आहेत. छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वतःला आणि स्वतःसोबत इतरांनाही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. खऱ्या अर्थाने महिला दिन त्यांच्या जगण्यातला एक भाग आहे. अगदी त्याचप्रमाणे हा एक दिवस साजरा करण्यापेक्षा तो प्रत्येकीच्या जगण्यातला एक भाग व्हायला हवा आणि त्यासाठी आपण स्वतःमधल्या ‘स्व’ चा शोध घ्यायला पाहिजे.

Popular Posts
Banner 02
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquare