Banner 01

‘दही-वडे’

साहित्य– पाउण कप उडदाची डाळ, १/४ कप ओल्या खोब-याचे पातळ तुकडे, ४-५ मिरं, २ कप पातळ ताक, दीड कप दही, ५-६ टे.स्पू. साखर, मिरपूड, लाल तिखट, चाट मसाला, मीठ, तळण्यासाठी तेल

पाककृती – (वडे)- उडीद डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. नंतर, त्यामधील अगदी थोडेसेच पाणी घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. वाटलेले मिश्रण थोडे दाटसर करावे, नंतर त्यात मीठ, ठेचलेले मिरे आणि खोब-याचे पातळ काप घालावेत. वडे मध्यम आचेवर गोल आकारात तळून घ्यावेत. काहीवेळेस वडे आतून कच्चे राहतात, म्हणून वड्यांचा आकार मोठा ठेवू नये.

(ताक)-  पातळ ताकात थोडी साखर आणि चवीपुरते मीठ घालून, तळलेले वडे त्यामध्ये साधारण अर्धा ते एक तास बुडवून ठेवावेत. तोपर्यंत वरुन घालावयाचे दही तयार करुन घ्यावे.

(दही)- वाडग्यात थोडे दही घेऊन, ते रवीने घुसळून त्यामध्ये पाणी घालून दह्यास आवश्यक तितका पातळपणा द्यावा. आवडीनुसार साखर व चवीस थोडे मीठ घालून हे मिश्रण थोडावेळ फ्रिजमध्ये गार होण्यास ठेवावे.

नंतर, ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घेऊन, त्यावर दह्यासोबत वरुन चाट मसाला, मिरपूड, व लाल तिखट घालून डिश सर्व्ह करावी.

मैत्रिणींनो! वरील, रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा खालील कमेन्टबॉक्सद्वारे!

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares