utsah banner

उत्साह बदलत्या दिवाळीचा!

‘दिवाळी’ म्हणजे हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पुजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज असे तब्बल सहा दिवस सारं जनजीवन हर्षमय करणारा दिवाळी सण. ज्याच्या प्रत्येक दिवसाला आहे खास महत्त्व! मिथ्यकथांच्या आख्यायिकेसोबत शास्त्रीय कारणांनी परिपूर्ण असलेला हा सण साजरा करण्याच्या पद्धतीला काळानुरुप नवे स्वरुप येताना दिसते आहे. नोकरीमय झालेल्या जीवनात सुट्ट्यांची गणितं वर्षाच्या सुरुवातीलाच पक्की करावी लागतात. मग जेमतेम एखादं दोन दिवस या सणाला घरी असण्याचा योग जुळून येतो. ‘छोटी कुटुंब, सुखी कुटुंब’ वाटली तरी संस्कार, रुढी यांच्यापासून मात्र वंचित रहातात. त्यामुळे, दिवाळीतील दिवसांचं महत्त्व लक्षात न घेता पिढीजात प्रथांचा गाडा ओढला जातो व लहान मुलंदेखील ‘माझा आवडता सण’ या निबंधापूर्ती सणाची माहिती मिळवून समाधानी होतात. पूर्वी हेच लहानगे आठवडाभर अगदी बेधुंद होऊन फटाके वाजवायचे. पावसाळ्यात घराजवळ वस्तीला असलेले किटक, साप आवाजाने दूर पळून जावेत हे देखील फटाके वाजवण्यामागील महत्त्वाचे कारण होते. या फटाक्यांच्या लांबचलांब माळा लावून केलेला अतिरेक प्रदुषणाला कारणीभूत ठरला व त्यामुळे ध्वनी व वायू प्रदूषणाच्या दृष्टीने फटाक्यांना विरोध करणे अत्यावश्यक बनले.

या सणाच्या निमित्ताने आणखी एक गोष्टीची आतुरतेने वाट पाहिली जायची. ती म्हणजे, दिवाळी सेल किंवा दिवाळी ऑफर. दुकाने गि-हायिकांनी सजायची, गर्दीतून वाट काढत, धक्काबुक्की सहन करत हौसेने नव्या कपड्यांची खरेदी व्हायची. मुख्यत्वे ह्याच दिवाळी खरेदीसाठी पगारातील रक्कम राखून ठेवलेली असायची. सध्या वर्षभर सुरु असणा-या ऑनलाईन सेलमुळे कदाचित याची क्रेझ कमी झाली असावी. दुकानदार व गि-हाईक यांची भेट आता ऑनलाईन होऊ लागली आहे. या शॉपिंगसारखाच फराळाही मोठा मान. विविध पदार्थांनी सजलेलं फराळाचं ही दिवाळीची खरी मेजवानी! स्त्रिया एकत्र जमून एकमेकींना मदत करत फराळ तयार करायच्या. आता, व्यस्त दिनक्रमामुळे एकत्र जमणं दूर, घरच्याघरी फराळ उरकण्याचीही उसंत मिळत नाही. यावर उपाय म्हणून रेडीमेट फराळ घरपोच पोहोचतो. पण त्यामध्ये मिसिंग असतो घरच्या सुगरणीचा आपलेपणा! रांगोळीही ‘ती’ चं हक्काचं क्षेत्र. तासनतास कंबरमोडून तयार केलेली रांगोळी मोठ्या उत्साहाने अंगण सजवायची. बाजारात मिळणा-या तयार रांगोळीने तिचीही जागा पटकावली. कंदील आणि पणत्या घराची प्रकाशयोजना सांभाळणा-या मुख्य बाबी. ह्यामध्ये फोल्डींग कंदील, धुता येईल अशा कंदीलाला नक्षीदार पणत्यांनी दिली.

या सा-यातून कमी वेळात दिवाळीचा संपूर्ण आनंद मिळवण्याची हळवी धडपड दिसून येते. दिवाळीचा साग्रसंगीत घाट दुर्मिळ झाला असला, तरी या शॉर्टकटच्या जमान्यात सणाचे महत्त्व मात्र टिकून रहायला हवे. तरंच, पुढची पिढी मोठ्या आतुरतेने दिवाळीची वाट पाहिल आणि सणाचा उत्साह मनामनात टिकून चिरकाल टिकून राहिल.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares