indian beauty banner

जागृतीची साथ मिळणार आणि सुंदर मी होणार !

निसर्गाच्या अनेक सौंदर्यांपैकी एक सौंदर्य आपण स्त्रिया आहोत. प्रेम, माया, आपुलकी या सगळ्यामुळेच आपले अंतरंग खऱ्या अर्थाने समृध्द आहेच पण निरोगी राहण्यासाठी आणि काळाच्या गरजेनुसार स्वतःला प्रेझेंटेबल करण्यासाठी शारिरिक निगा राखणे देखील आवश्यक आहे. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना आणि वेगवेगळ्या वातावरणात काम करताना भरडली जाते ती आपली त्वचा. त्याचं मुख्य कारण म्हणजे प्रदूषण. या प्रदूषणाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. परिणामी त्वचेवर ओरखडे येणे, त्वचा निस्तेज दिसणे, काळवंडणे डोळ्याभोवती काळी वर्तुळे, पिंपल्सच्या समस्या या आणि अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि अशा समस्यांच्या बाबतीत आपण जास्तच संवेदनशील असतो नाही का ? मग अशा समस्यांवर इलाज म्हणून अनेक पर्याय डोळ्यासमोर पिंगा घालायला लागतात. बाजारात देखील सौंदर्य प्रसाधनांची काही कमी नाही त्यामुळे हे प्रोडक्ट वापरू की ते प्रोडक्ट वापरु अशा विचाराने चंचलता येते आणि ते प्रोडक्टस आपल्या त्वचेसाठी योग्य असतीलच याबद्दल मात्र साशंकता असतेच. अशा परिस्थितीत घरगुती नैसर्गिक उपायांचा पर्याय केव्हाही चांगलाच नाही का ? अशा घरगुती आणि नैसर्गिक गोष्टींमध्ये रासायनिक बाबींचा भडिमार नसतो त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुक्सान होण्याची शक्यता नसते काळाच्या ओघात अशा उपायांचा थोड्याफार प्रमाणात विसर पडलाय. त्यामुळे या उपायांबद्दल जागरूक होण्याची हीच खरी योग्य वेळ आहे . काय असू शकतात घरगुती उपाय :

  • चेहऱ्यावर दह्याने मसाज केल्याने त्वचा मऊ होण्यास मदत होते.
  • हळद किंवा आंबेहळद, डाळीचे पीठ आणि दुध असे मिश्रण करून लेप चेहऱ्याला, मानेला आणि हाताला लावल्याने त्वचेला उजाळा येतो.
  • कच्च्या बटाट्याची कापं चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे ठेवावीत. तेलकट त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते.
  • हातापायावरील ओरखडे घालवण्यासाठी त्यावर लिंबाची साल त्यावर चोळावी. कालांतराने ओरखडे कमी होऊन निघून जातील.
  • कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करून ती चेहऱ्याला लावल्यास पिंपल्सला आळा बसेल.
  • ओठ फुटल्यावर साजुक तूप लावल्याने ओठ मऊ होतात.
  • या व्यतिरिक्त मुलतानी माती आणि गुलाबपाणी याचा वापर देखील चेहऱ्यावर करू शकता. आयुर्वेदिक भांडारमध्ये अगदी परवडणाऱ्या किमतीत मुलतानी माती आणि गुलाबपाणी मिळू शकते.
  • कच्च अंड फेटुन डोक्याला लावले तर कोंडा कमी होतो आणि केस सिल्की व्हायला देखील मदत होते.
  • मातीशी संपर्क आल्यावर पायाला भेगा पडण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे घराबाहेर पडताना नेहमीच सॉक्सचा वापर करा.
  • बाह्य उपायांसोबत त्वचेसाठी आहारात पालेभाजी, कडधान्य, फळे यांचा नियमित समावेश असावा. जंक फ़ूड , फास्ट फ़ूड खाण्याचे टाळणे फायदेशीर आहे.

हे असे विविध पर्याय आहेत जे उपाय अगदी सोपे आणि घरच्या घरी सहज करता येऊ शकतात. महागड्या ब्युटी ट्रीटमेंट आणि इतर सौंदर्य प्रसाधनांचा अतिरिक्त वापर करण्याऐवजी नैसर्गिक गोष्टींचा वापर आणि आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत काटेकोर राहण्यासाठी सकारात्मक मानसिकता जोपासायला सुरुवात करा.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares