PATPAT (1)

झटपट होणारे काही गोडाचे पदार्थ

गुढीपाडवा म्हटलं कि श्रीखंड-पुरी, पुरणपोळी असे काहीसे पारंपारिक पदार्थ ठरलेले असतात; पण प्रत्येकवेळी असे पदार्थ बनवणे शक्य होतेच असे नाही आणि त्यात असे पदार्थ बनवायचे म्हणजे आधीपासूनच व्यवस्थित तयारी आणि मदतीला हात हवेच नाही का ?

मग सणासुदीला गोडधोड पदार्थ कोणते करायचे हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोरच उभा राहतो. म्हणूनच काही खास सोपे पदार्थ तुमच्यासाठी देत आहोत.

१.गुळाचा भात :

साहित्य :
१ कप भिजवून घेतलेले तांदूळ, किसलेला गुळ ३ मोठे चमचे, तूप ३ मोठे चमचे, काजू आणि किसमिस १० ते १२ , सुंठ आणि वेलची पावडर अर्धा चमचा, मीठ चिमुटभर

कृती :
एका नॉन स्टिक भांड्यात तूप सुमार गरम करा. काजू आणि किसमिसचे तुकडे त्यावर परतून घ्या. त्यानंतर त्यावर तांदूळ घालून हलक्या हाताने परतून घ्या. त्यावर २ कप पाणी घालून पुन्हा हलवून घ्या. आता त्यावर सुंठ आणि वेलची पावडर घालून एकजीव करून घ्या आणि उकळी येण्याची वाट बघा. उकळी आली कि मात्र कमी आचेवर पाणी आटेपर्यंत ठेवा आणि अधून मधून हलवत रहा.

२. कुरमुर्याचा लाडू :
लहान मुलांसाठी म्हणून तुम्ही हा लाडू अगदी झटपट बनवू शकता.

साहित्य :
एक बाउल कुरमुरे, किसून घेतलेला गुळ

कृती :
एका जाड बुडाच्या भांड्यात मंद आचेवर गुळ गरम करत ठेवा. अधून मधून तो हलवत रहा. थोडासा पातळ झाल्यावर १ चमचा पाणी टाका. त्यामुळे गरम गुळ काळपट होणार नाही. गुळाचा रंग सोनेरी दिसायला लागला कि गॅस बंद करून त्यावर कुरमुरे टाका. कुरमुरे टाकल्यानंतर हलक्या हाताने व्यवस्थित हलवून घ्या जेणेकरून प्रत्येक कुरमुर्याला गुळ लागेल. त्यानंतर गरम असताना याचे लाडू वळायला घ्या.

३. मालपुआ

साहित्य :
१ कप कणिक, दुध ५० ग्रॅम, सुंठ आणि वेलची पावडर, गुळ, तूप

कृती :
एका भांड्यात कणिक, किसून घेतलेला गुळ, सुंठ – वेलचीची पावडर आणि दुध यांचे मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळावे. कणकेच्या आणि गुळाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यानंतर नॉन स्टिक तव्यावर तूप घालून हे मिश्रण डोशासारखे टाकावे, मग गरम गरम मालपोहे खाण्यासाठी तयार असतील.

४. शेवयांची खीर :

साहित्य :
बारीक शेवया २ वाटया, ५ वाटया दूध, १ चमचा साजूक तूप, वेलदोडयांची पूड, ३/४ बदामाचे काप, बेदाणे, चारोळी, १ वाटी साखर.

कृती :
जाड बुडाच्या पतेल्यामध्ये दूध घालून सतत ढवळत रहावे आणि निम्मे होईपर्यंत आटवून घ्यावे. शेवया थोडया मोडून दुसर्‍या पातेल्यात मंद गॅसवर तुपात गुलाबीसर भाजाव्यात. भाजलेल्या शेवयांवर आटवलेले दूध घालावे, चांगले उकळले की साखर घालावी व एक उकळी येऊन साखर विरघळली की उतरवावे. गार झाल्यावर वेलची पूड, बदाम, बेदाणे घालावे.

५. बासुंदी :

साहित्य:
४ लिटर दुध,१/४ कप बदाम-पिस्ते ,२ टीस्पून चारोळी,३/४ ते १ कप साखर,१ टीस्पून वेलची पूड

कृती :
एका जाड बुडाच्या पातेल्यात दुध उकळत ठेवावे. ते करपू नये म्हणून अगदी तळापासून ढवळत रहावे. दुध आटले कि त्यात बदाम-पिस्त्याचे काप, चारोळी घालावी आणि आपल्या अंदाजाने साखर घालावी. १० मिनिटे उकळी काढून गॅस बंद केल्यावर थोडीशी वेलची पूड टाकावी. थंड खीर देखील चवीला छान लागते त्यासाठी २ ते ३ तास ती फ्रीज मध्ये ठेवा.

असे काही झटपट होणारे गोडाचे पदार्थ तुम्ही नक्की करू शकता.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares