bondd (1)

मी आहे माझ्या बाबांची लाडकी!

‘कुटुंब’ म्हणजे ‘माणसं’! पूर्वी मोठाल्या कुटुंबात माणसांची संख्याही खूप होती. आता, गावातून शहराकडे स्थलांतरीत होणे अनेकांनी पसंत केले आणि बहुतांश भावंडे विभक्त झाली. पुढे ‘हम दो हमारे दो किंवा एक’ या नियोजनांतर्गत सख्खी भावंडेही तुरळक झाली व नात्यांचा गोतावळा देखील कमी कमी होत गेला. अशा कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे त्या कुटुंबातील प्रत्येकाशी काही खास नाते असते. ज्याप्रमाणे, आजी आजोबा आणि नातवंडे यांच्यामधील आदरयुक्त मैत्रीचे नाते, भावा बहिणीतील खोडकर बंध, आई मुलातील हळवेपणा आणि अशाच विविध भावभावनांनी दृढ झालेले आणखी एक स्पेशल नाते असते ‘बाप-लेकीचे’!!

‘मुलगी नको’ असं म्हणणारे अनेक महाभाग आपल्या समाजात आजही मोठ्या संख्येने आहेत, पण या संकुचित विचारसरणी पलिकडे आपल्या लेकीवर निखळ प्रेम करणारे वडीलही आहेत. लहानश्या ‘ती’चे घरी आगमन झाले की घर अगदी बहरुन जातं आणि तिच्या बाबाला तर एक नवी मैत्रीणच मिळते. तिच्या हसण्याने तोही आनंदी होतो, तर तिच्या रुसण्याने तोही दु:खी!! आर्थिक स्थिती भक्कम असो किंवा नसो मुलीचे लाड पुरविण्यात आता तो पूर्ण दंग झालेला असतो. इवलीशी असल्यापासून आपली लेक लग्नाची होईपर्यंतचा तिचा प्रवास जगणारा ‘बाबा’  आयुष्यभर आपल्या मुलीवर नि:शब्दपणे प्रेम करीत राहातो. तिचं बालपण, शिक्षण आणि मग लग्न सारी कर्तव्ये पार पाडताना मनोमन सुखावणारा ‘बाबा’ जेव्हा ‘ती’ कायमची सासरी निघून जाण्याची वेळ येते तेव्हा तितकाच हळवा होतो.

मराठी साहित्यात बाबा आणि मुलीच्या नात्यावर आधारीत अनेक छान कविता शब्दबद्ध झाल्या आहेत. ज्या त्या दोघांचे भावविश्व अचूक टिपताना दिसतात. कवी संदीप खरे यांची ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ही कविता वडीलांवरील कवितेचे एक देखणे उदाहरण, असे म्हणायला हरकत नाही. या कवितेच्या  या शेवटच्या ओळी ऐकल्यावर नि:शंकपणे प्रत्येक लेकीच्या डोळ्यात पाणी तरळतेच,

“तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग?

मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग?

सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये,

 बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये?”

      पूर्वीपासून ‘आई’ या व्यक्तिरेखेला विशद करणारे काव्य मोठ्या प्रमाणात रचले गेले, आणि ‘वडील’ हे नाते दुर्लर्क्षित राहिले असे म्हटले जायचे. मात्र, याच सुंदर नात्याचा ठेवा जपणा-या ‘वडीलांच्या कविता’ही आता मराठी साहित्यात दिसू लागल्यात, ज्यामध्ये कमी शब्दांत व्यापक असा ‘बाप-लेकी’च्या नात्याचा भावबंध गुंफला जातोय!!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares