confident banner

आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी द्या साथ स्वतःला स्वतःची !

अनेक रुपं, भूमिका, अनेक ठिकाणी वावर, अनेक कामं, जबाबदाऱ्या घेऊन आपली दिनचर्या सातत्याने चालू असते. वयाच्या प्रत्येक टप्प्यात आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंफत जातो अगदी सहजतेने ! आणि ते गुंफत जाणं देखील आपण आनंदाने स्विकारतो;पण आता गरज आहे ती स्वतःकडे सुद्धा पुरेसे लक्ष देण्याची . त्यात महत्त्वाची बाब ठरते ते म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व.

नेतृत्वासाठी पुढाकार , वक्तृत्वामध्ये निर्भीडपणा आणि चांगल्या कर्तुत्वासाठी प्रयत्न हे पैलू आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असतात. सौंदर्यामुळे केवळ आकर्षक व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो असा समज चुकीचा आहे. सुंदरता हा त्यातला एक अंशतः भाग आहे हे कायम लक्षात असायला हवे. स्वतःला प्रेझेंटेबल करण्यासाठी मेकअपचा उपयोग करायला हरकत नाही;पण मेकअपवर व्यक्तिमत्त्व अवलंबून असू शकत नाही.

व्यक्तिमत्त्व या शब्दच सर्वसमावेश आहे. यामध्ये व्यक्तीचे अंतरंग आणि बाह्यस्वरूप अभिप्रेत आहे. ‘First impression is last impression’ असं म्हटलं जातं ते व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीनेच ! एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची शक्ति आपल्याला निसर्गदत्त आहे पण स्वतःमधलल्या ‘स्व’ला प्राधान्य देण्यासाठी आकर्षकता हवीच. शिक्षण, नोकरी,कौटुंबिक जबाबदाऱ्या यासगळ्यामध्येच अधोरेखित होत असतं ते आपलं व्यक्तिमत्त्व ! काही बाबी तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी :

सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे कि, व्यक्तिमत्त्व ही खर्चिक बाब नाही तर त्याचा प्रत्येक पैलू हा स्वप्रयत्नांतून विकसित होत असतो.

1. बोलण्यात नेहमी सामंजस्य असावे त्यातून संवाद सुरळीत होण्यास मदत होतो

2. बोलताना नजर स्थिर ठेवणे आवश्यक आहे. त्यातून तुम्ही ठोसपणे बोलत आहात असा विश्वास मिळतो.

3. जे बोलाल ते आत्मविश्वासाने बोला जेणे करून आपले बोलणे अधिक स्पष्ट होईल.

4. हसताना प्रसंगावधान असणे आवश्यक आहे. त्यातून तुमची गांभीर्यता दिसून येते

5. पेहराव करताना तो आपल्याला साजेसा आहे की नाही याचा अंदाज घेतला पाहिजे. जेणेकरुन वावरताना तुम्ही comfortable असाल.

6. व्यक्तिमत्व हे वयावर अवलंबून नसते. फ़क्त स्वतःवर विश्वास, स्वतःबद्दल प्रेम आणि प्रसन्नता असेल तर कोणत्याही वयात आपण active राहू शकतो.

7. नव्याचे नऊ दिवस असे म्हटले जाते. त्यामुळे काही गोष्टी ठरवल्या की थोड़े दिवस त्याचे आचरण करायचे आणि नंतर पुन्हा जुन्याच गोष्टी रेटत राहयच्या अशी मानसिकता कधीही वाईटच असते. त्यामुळे स्वतःसाठी ठरवलेल्या सकारात्मक गोष्टी सक्रीयपणे अमलात आणण्याकडे नेहमी कल असला पाहिजे.

8. सहनशील, दुबळेपणा आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाला मारक ठरतात. स्त्री म्हणून आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कुणीही गृहीत धरता कामा नये यासाठी नेहमी काळजी घेतली पाहिजे. स्वतःचे आकर्षक व्यक्तिमत्त्व तयार करणे किंवा घडवणे ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही; पण हळूहळू स्वतःबद्दलचा अंदाज घेऊन एक एक पाऊल पुढे टाकले पाहिजे आणि अर्थातच ही प्रक्रिया सातत्यपूर्ण असली पाहिजे.त्यातूनच स्वतःवरचा विश्वास वाढेल. याच आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे नवनव्या गोष्टींचा शोध घ्यायला तुम्ही देखील सज्ज व्हाल.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares