छोटेसे बहिण भाऊ!!

नात्यांना व्यक्तिच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जन्मल्यापासून जोडल्या गेलेल्या प्रत्येक नात्याचं वेगळं वैशिष्ट्य देखील आहे. आई, बाबा, मावशी, आत्या, आजी-आजोबा, ताई, दादा नात्यांच्या या गोतावळ्यात दडलेलं ‘बहिण भाऊ’ नावाचं हळवं नातं पुराण कथांमध्येही दिसून येतं. दिवाळी उत्सवात बहिण भाऊ नात्याला मानाचे स्थान देत ‘भाऊबीज’ साजरी केली जाते. या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे म्हणण्यामागील मजेशीर आख्यायिका मृत्यूदेवता ‘यम’ व त्याची बहिण यांच्याशी निगडीत आहे. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना नरक यातना भोगाव्या लागत नाहीत. पुराण कथा असे सांगत असली तरी, लहानमुलांना भाऊबीजेचे प्रंचड आकर्षण असते ते मिळणा-या ओवळाणीमुळे! मिळणा-या भेटवस्तूंच्या आनंदात लहानगे रमतात तर, मोठे बालपणीच्या आठवणींमुळे भावनिक होतात.

मुख्य प्रथा भावाने बहिणीच्या घरी जाण्याची आहे मात्र, हल्ली सोयीप्रमाणे एकाच घरी सगळी भावंडे एकत्र जमून सोहळ्याचा आनंद घेतात. ज्यामुळे छोटं ‘गेट टू गेदर’ देखील होतं. वर्षभर आपापल्या कामात गुंतून गेलेली भावंड हा दिवस एकमेकांसाठी राखून ठेवतात. पूर्वी सख्खे चुलत सारे एकाच छताखाली नांदत, आता कुंटुंबं विखरुली आणि त्यांचा आकारही लहान झाल्याने सख्खी भावंडं दुर्मिळ होऊ लागली. बहिण किंवा भाऊ नसलेल्यांना मानलेल्या नात्यांचे महत्त्व उमजले. यामुळे, शेजारची नाती आणखी जवळ आली. शाळा, कॉलेजेसमध्ये भावा बहिणींची नाती जोडली गेली व वर्षानुवर्ष ती निभावली देखील जात आहेत. स्त्री पुरुषांमधील भाऊ-बहिण नात्याचा हा निखळ बंध असाचं कायम राहू दे आणि उत्तरोत्तर या नात्यातील आदर सामाजिक पातळीवर कायमचा विसावा घेऊ दे!

Comments
More Articles
Designed and Developed by SocioSquare

Please wait...