बीझी दिनक्रमाला जरासा ब्रेक देऊन हक्काचे निवांत ठिकाण गाठायचे, तर सेकंड होम हवे किंवा गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय म्हणूनही सेकंड होमचा विचार केला जातो. मात्र, असे घर विकत घेण्याची जोखीम उचलताना प्रत्येक निर्णय लक्षपूर्वक घ्यावा लागतो. कारण छोट्या मोठ्या वस्तूंच्या व्यवहाराहून घर खरेदीचा व्याप प्रचंड वेगळा असून, घर विकत घेतल्यानंतरही अनेक न संपणारी कामे मागे लागतात. उदाहरणार्थ, घराची देखभाल, दुरुस्ती, सुरक्षितता अशा जबाबदा-या वाढत जातात. ज्या न कंटाळता पार पाडण्याची तयारी हवी.
सेकंड होमचा विचार करताना प्राथमिकता ठरवणे महत्त्वाचे ठरते. गजबजाटापासून दूर, निसर्गाचा सहवास हवा, व्यवहारातून होणारा फायदा अशा बाबींचा नीट विचार करुन जागा निवडावी. बंगला की फ्लॅट हे ठरवणेही महत्त्वाचे आहे. कारण जागा जितकी मोठी तितकी भविष्यात उद्भवणारा खर्चही वाढता असणार हे खरे.
प्रामाणिक कर्जदारांना सहाय्य करण्यासाठी बॅंका कायम उत्सुक असतात. त्यामुळे, बॅंकेचे होम लोन किंवा नवनव्या योजना नीट समजून घेतल्या तर व्यवहार करणे सोयीस्कर होईल व व्यवहारात तोटा होणार नाही. यासाठी बॅंकेची नियमावली नीट अभ्यासून घ्यावी.
जसे, सेकंड होमचे सुखदायी फायदे आहेत, सोबत एखाद दोन तोटेही आहेत. बरेचदा असे फार्म हाऊस किंवा निसर्गरम्य फ्लॅट असणा-यांना मित्रमंडळी किंवा नातेवाईकांचे तिरकस अनुभवही येतात. विकेंड किंवा सुट्टीनिमित्त हक्काने सेकंड होम एक दोन दिवसासाठी मागतात. पण, तितक्याच हक्काने त्याची निगा राखत नाहीत किंवा स्वच्छता करीत नाहीत. अशा समस्यांशी सामना करण्याची कला तुमच्याजवळ हवी. तसेच, अशा सेकंड होमवर क्वचित जाणे होते त्यामुळे त्या घराच्या सुरक्षिततेची देखील विशेष काळजी घ्यावी लागते.
रोजच्या रुटिनमधून प्रत्येकाला विश्रांती हवी असते. अशावेळी, हॉटेल किंवा रिसॉर्टपेक्षा घरापासून दूर हक्काचे घर असणे परवडते. कुठल्याही आगाऊ बुकींगशिवाय कुटुंबासोबत केव्हाही जाण्याचा पर्याय उपलब्ध होतो तो सेकंड होममुळे!