गोड बातमी कळताच, होणा-या आईला अनुभवी व्यक्तिंकडून आहाराचे सल्ले मिळू लागतात. काय खावे व काय खाऊ नये या पदार्थांची भली मोठी यादी तयार होते. भरपूर माहिती गोळा झाली, की गोंधळही तितकाच होतो. आईचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सुदृढ असावा यासाठी गर्भापर्यंत पौष्टिक आहार पोहोचणे आवश्यक असते. म्हणूनच, या दिवसांत स्त्रीने जेवणात कुठल्या पदार्थांचा समावेश करावा व का याविषयीची माहिती जागृतीच्या मैत्रिणींसाठी,
दूध आणि फळे –
दूध व दुग्धजन्य पदार्थांचे नियमित सेवन करावे. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी ते महत्त्वाचे आहे. कोवळ्या खोब-यापासून काढलेले दूध, दही, चीझ, पनीर या पदार्थांचाही आहारात समावेश करावा. बाळाच्या हाडांच्या मजबूतीसाठी दूध हा घटक महत्त्वाचा ठरतो.
पालेभाज्या –
शरीराला लोह पुरविणारा हा आहार गरोदर स्त्रियांसाठी अत्यावश्यक आहे. मेथी व पालक या मुख्य भाज्यांप्रमाणे इतर पालेभाज्याही खाव्यात. त्यामधून मिळणारे कॅल्शियम मेंदूच्या विकासासाठी, जन्मजात दोष टाळण्यासाठी गरजेचे आहे, बाळाच्या वाढीसाठी ते आवश्यक ठरते. अंजीर, काळ्या मनुका, ओट्स हे पदार्थही खावेत.
पाणी –
शरीराची आंतरीक स्वच्छता राखण्यासाठी पाणी महत्त्वाचा घटक आहे. दिवसभरात साधारणत: पाच तांबे पाणी प्यावे. बद्धकोष्ठता होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच, नियमित शहाळ्याचे पाणी किंवा सूप, ताक, संत्र्याचा रस घ्यावा. शरीरातील उष्णतेचा बाळाला त्रास होऊ नये, म्हणून ही पेये उत्तम पर्याय ठरतात.
अंडी आणि मांसाहार –
गरोदरकाळात मांसाहार खाण्यास हरकत नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचे प्रमाण ठरवावे. अंडी व मांसाहार प्रोटिन्स पुरवते. याद्वारे, शरीराला उत्तम दर्जाचे प्रोटिन्स मिळतात. गर्भातील स्नायूंच्या आरोग्यासाठी ते आवश्यक असते.
गरोदरपणात उच्चरक्तदाब किंवा मधुमेहाची समस्या उद्भवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेवणातील मीठाचे प्रमाण ठरवावे. चिवडा, फरसाण, लोणची असे मीठ जास्त असणारे पदार्थ टाळले पाहिजेत, यामुळे अॅसिडिटीचा त्रास होणार नाही. मुख्यत्वे, घरचे सात्त्विक जेवणच शरीरासाठी पौष्टिक ठरते. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणखी पौष्टिक पदार्थांचा यामध्ये समावेश करा मात्र, वर नमूद केलेल्या पदार्थांना टाळणे अशक्य असून, आईने बाळासाठी या आरोग्यदायी पदार्थांचा आहार घ्यायलाच हवा.