ड्रेसवर मॅचिंग कानातले अगदी विचारपूर्वक घालतो. तितकीच किंवा त्याहून जास्त विचारपूर्वक केली जाते हेअर स्टाईल! केसांवर वेगवेगळे प्रयोग करायचे, तर आधी त्यांची नीट काळजी घ्यायला हवी. सिल्की व सरळसोट केसांना सांभाळणे नक्कीच सोप्पे आहे, पण कर्ली हेअर्स असणा-या मुलींनाही त्यांच्या केसांचा हल्ली वैताग येत नाही. कारण, साध्या सरळ केसांपेक्षा, छोट्या छोट्या गोलाकार वळणांचे मिस्टर कुरळे फॅशनचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. थंडीत या कुरळ्यांचे सौंदर्य खुलविणा-या या टिप्स तुम्हाला नक्की उपयुक्त ठरतील.
१. केसातील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी कोरफडीचा गर केसांना १० मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत.
२. केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून तयार केलेला लेप केसांना लावावा.
३. चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येण्यास मदत होते.
४. कुरळ्या केसांसाठी मोठ्या दातांना कंगवाच वापरावा.
५. केस धुताना जरासे कोमट पाणी वापरावे व केसांना हळुवार धुवावे.
६. आठवड्यातून एकदा तरी कंडिशनरचा वापर करावा किंवा शॅम्पू केलेल्या केसांवर लिंबूपाणी लावावे.
७. केस सुकवताना ड्रायरचा वापर करु नये. टॉवेलने केस कोरडे करुन घ्यावेत, यामुळे केस सुकल्यानंतर तर पिंजारलेले दिसणार नाहीत.
८. कुरळ्या केसांच्या मुळांपर्यंत तेल पोहोचणे कठीण जाते. अशा केसांना भरपूर तेल लावावे लागते व नंतर केस धुताना जास्त शॅम्पू वापरल्याने केस कोरडे होतात.
९. हा पेच सोडविण्यासाठी केस दररोज धुवू नयेत, तसेच कंडिशनरमिश्रित शॅम्पू वापरु नये.
१०. केस ओले असताना विंचरु नये, कुरळे केस धुतल्यानंतर जास्त गुंतलेले असतात, ते तुटण्याची शक्यताही अधिक असते.
११. केस धुतल्यानंतर केसांना टॉवेलमध्ये घट्ट बांधून ठेवू नये. कपड्याने पाणी टिपून घ्यावे.
जगावेगळा केशसांभार म्हणून ओळखल्या जाणा-या कर्ली हेअर्सना आणखी आकर्षक बनवा विविध हेअर स्टाईल्सने, मात्र त्याआधी मिस्टर कुरळ्यांची काळजी घेणा-या या टिप्स लक्षात ठेवा व थंडीतही स्प्रिंगसारख्या नॅचरल कर्ल्सचा तोरा मिरवा निश्चिंतपणे!