comb banner

कंगवा स्वच्छ करण्याच्या अचूक पद्धती, वाचा इथे

केसांची काळजी घेण्यासाठी आवश्यक साहित्यांपैकी एक महत्त्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे कंगवा! जो तो आपापल्या सोयीनुसार हव्या त्या आकाराचा, प्रकाराचा कंगवा वापरतो. मात्र, त्यापैकी कितीजणं कंगवा नियमित स्वच्छ करतात? कंगव्याच्या दातांत केस अडकतात, कोंड्याच्या तेलकटीमुळे त्यात धुळीचे कण जमतात, मग त्यावर बुरशी येते आणि असा कंगवा वापरल्यामुळे केसासोबत डोक्याची त्वचाही खराब होते. या परिणांना दूर ठेवायचे असेल, तर वापरातील सर्व कंगवे वेळीच स्वच्छ करायला हवेत. चला तर लागूया ना कामाला, पुढील पद्धतींनी कंगवा झटपट स्वच्छ होईल.

  1. प्रथम कंगव्यात अडकलेली केसाची गुंत काढून काटा. टूथपिकच्या सहाय्याने कंगव्यात अडकलेले लहान सहान केस, धुळमातीचे कण काढून टाकावेत.
  2. त्यानंतर मोठ्या बाऊलमध्ये गरम पाणी घेऊन त्यात थोडा शॅम्पू किंवा डिटरर्जंट पावडर टाकावी. मिश्रण नीट ढवळावे.
  3. वरील मिश्रणात १५ ते २० मिनिटे कंगवा बुडवून ठेवावा, नंतर टूथब्रश किंवा कापडाच्या सहाय्याने कंगव्यातील फटी साफ कराव्यात.
  4. टूथब्रश किंवा कापडाने कंगवा स्वच्छ केल्यावर तो वाहत्या पाण्याखाली धरावा. अशाप्रकारे, कंगवा पूर्णत: स्वच्छ झाल्यावर रात्रभर त्यास व्यवस्थित सुकू द्यावे. जर तुम्हाला लगेचच तो कंगवा वापरायचा असेल, तर सुक्या कापडाने किंवा ड्रायरच्या मदतीने कंगवा नीट कोरडा करुन मगच त्याचा वापर करावा.

किमान दोन आठवड्यातून एकदा तरी कंगवा अशात-हेने स्वच्छ करायलाच हवा आणि याआधी कित्येक महिने तो धुतला नसेल, तर मात्र पुढील प्रमाणे त्याचे डीप क्लिनिंग व्हायला हवे.

पद्धत थोडीफार समान असली, तरी कंगवा बुडवून ठेवायचे मिश्रण गरजेनुसार विविध प्रकारे बनवता येते.

  • एका बाऊलमध्ये रबिंग अलकोहोल किंवा ऍपल साइटर व्हिनेगर घेऊन, त्यामध्ये प्लॅस्टिकचा कंगवा १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवावा. त्यानंतर पुढील प्रक्रिया वरीलप्रमाणेच राहील. यापैकी कुठल्याही मिश्रणात इतर लाकडी किंवा पॅडल प्रकारातील ब्रश पूर्णपणे न बुडवता फक्त त्या कंगव्यांचा दाताकडील भाग बुडवून ठेवावा. मिश्रणाचे आणखी काही पर्याय पुढीलप्रमाणे आहेत.
  • बाऊलमध्ये व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा घ्यावा. जितके हे जिन्नस घ्याल त्याच्या चार पट पाणी घेऊनत तयार मिश्रणात कंगवा थोडावेळ बुडवून ठेवावा, नंतर टूथपीकने स्वच्छ करावा. लाकडी कंगव्यासाठी हे मिश्रण वापरु नये.
  • तसेच, आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे, १:४ या प्रमाणात अनुक्रमे हायड्रोजन पॅरॉक्साईडमध्ये पाणी मिसळावे, त्यात कुठल्याही प्रकारचे कंगवे बुडवून ठेवू शकता. हे मिश्रण कंगव्यातील फक्त धूळ स्वच्छ करत नाही, तर साध्या डोळ्यांनी न दिसणारे सूक्ष्म जीव, बुरशी सारखे घटकही नष्ट करते.

कंगवा स्वच्छ असणं केसांची काळजी घेण्याची पहिली पायरी आहे. त्यामुळे, येत्या विकेंडला हे काम तडीस न्यायलाच हवे. तसेही हे फार खर्चिक किंवा वेळखाऊ देखील नाही.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquare