हवेतील गारठा वाढतोय, सोबत सर्दी, खोकला, ताप अशा आजारांचे सत्रही सुरु झालेय. मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांची रोगप्रतिक्रारशक्ती कमी असल्याने, त्यांना ऋतूबदलामुळे होणा-या संसर्गजन्य आजारांची लगेच लागण होणे. मग आजारपणामुळे शाळेत जाता येत नाही, अभ्यास मागे पडतो, याचा परिणाम परिक्षेच्या मार्कांवर होतो.
या सा-याला सामोरे जायचे नसेल, तर तब्येतीची पूर्वकाळजी घ्यायला हवी! आहारात योग्य बदल करुन स्वेटर, मफलर सारखे उबदार कपडेही नियमित वापरावेत. मात्र, शरीरातील उष्णतेचे संतुलन साधण्यासाठी, पुढील जिन्नसांचा छोट्यांच्या आहारात समावेश करावा.
१. थोडाश्या पाण्यात दोन बदाम भिजत घालावेत, सकाळी या बदामांची साले काढून खाण्यासे द्यावेत.
२. तसेच ब्रेकफास्टसोबत काजू, मनुका किंवा अक्रोड असा थोडासा पौष्टिक खुराक द्यावा.
३. बाजरीची भाकरी त्यावर लोणी किंवा तूप लावून गरमागरम खाण्यास द्यावी. तसेच, भाकरीसाठी उकड बनवताना त्यामध्ये थोडे तीळ मिसळावेत.
४. मांसाहार घेत असाल, तर अंडी, मासे, मटण आवर्जून खावे. नेहमी अंड्याचा साधा पोळा किंवा उकडलेले अंडे खाऊन मुले कंटाळतात, यावर उपाय म्हणजे अंड्याच्या नवनव्या रेसिपीज नक्कीच ट्राय करता येतील.
५. हिवाळ्यात पालेभाज्या, फळभाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. सर्व प्रकारच्या हिवाळी भाज्या, फळे यांचा आहारात समावेश असावा. लहान मुलांच्या नावडत्या भाज्यांवर छानसा प्रयोग करुन एखादी टेस्टी डीश बनवलीत, तर हसत खेळत भाज्या फस्त होतील.
६. वर्षभर गार पाणी पिण्याची सवय असली, तरी थंडीत शक्यतो कोमट पाणी प्यावे. यामुळे, पचनसंस्था निरोगी रहाते.
लहानांसोबत घरातील सर्वच सदस्यांनी असा हिवाळी आहार घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यातील आरोग्यदायी वातावरणाचा योग्य फायदा करुन घ्यायला हवा. म्हणूनच, आजारी न पडता पौष्टिक आहाराच्या मदतीने उत्तम स्वास्थ्य बनवूया!!