स्त्री सुरक्षेविषयी बोलताना बाह्या सरसावून पुढे येणारे अनेक आहेत, पण त्यापैकी कितीजणं नजरेसमोर एखाद्या स्त्रीवर विपरीत प्रसंग ओढवल्यावर तितक्याच ताकदीने गुन्हेगाराशी दोन हात करतात. बघ्याची भूमिका घेणा-यांची मानसिकता बदलणे अवघड आहे. म्हणूनच, महिलांना वेळोवेळी स्वसंरक्षणार्थ सक्षम होण्याचे आवाहन केले जाते. कराटे, ज्युडोसारखे सेल्फडीफेन्स कोर्स काही शाळांमध्ये मुलींसाठी सक्तीचे केले गेलेत. कोवळ्या वयातच त्यांना स्वत:चे रक्षण करण्याची हिंमत दिल्याने, विकृती समोर उभी ठाकलीच, तर मदतीसाठी कुणावर अवलंबून रहावे लागणार नाही.
स्त्री पुरुष समानतेचा हट्ट पूर्ण होईलही, पण दोघांतील शक्तीचा भेद कसा मिटवणार? ताकदीने पुरुषापुढे स्त्री कमजोर ठरते. निसर्गदत्त शारीरिक भेदाने तिला अबला म्हणून हिणवले असले, तरी गेली कित्येक दशके तिने बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वत:ला सबला म्हणवून घेण्यास भाग पाडलेय. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, त्याच्या तोडीसतोड कार्य करताना ‘ती’ पुरुषांपुढेही वरचढ ठरतेय. बौद्धिक उच्चांग गाठत तिने स्वत:ला सिद्ध केले असले, तरी तिच्या मागचे शुक्लकाष्ठ संपलेले नाही. अर्धी लढाई अजून बाकी आहे सुरक्षित अस्तित्त्वाची लढाई! आणि यासाठी वापरावी लागले युक्तीची युद्धनिती.
छेडछाड, लैगिंक अत्याचार, विनयभंग, बलात्कार अशा तत्सम स्त्री पिळवणूकीचा घसरता आलेख प्रत्येक स्तरातील महिलेपर्यंत पोहोचलाय. रात्री अपरात्री एकटीचा प्रवास, गर्दीचा त्रास, ऑफिसचा स्टाफ अगदी घरातल्या घरातही कित्येकींना स्वत:ची सुरक्षितता झगडून मिळवावी लागते. आपण प्रत्येकीने कधीनाकधी या छळवादाचा अनुभव घेतलाय. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे, छोटे मोठे प्रसंग जसे, गर्दीचा फायदा घेऊन हात लावण्याची विकृती, रोखून पाहाणारी नजर आपणही अनुभवलवीये. काहीजणी मोठ्या धीराने अशा प्रसंगाला सडेतोड जवाब देतात. तर काही, शांत, बुज-या, भित्र्या स्वभावाच्या मुली महिला बावचळून जातात. काय करावे, कशी प्रतिक्रिया द्यावी, विरोध कसा करावा हे नकळल्याने खजील होऊन गप्प राहतात. अशा मैत्रिणींच्या पाठी खंबीरपणे उभे ठाकणे म्हणजे, खरी सक्षमता.
स्वत:च्या रक्षणासाठी पेपर स्प्रे, सेफ्टी रॉड, फ्लॅशलाईट सारखी उपकरणे आपल्या पर्समध्ये कायम असावीत, तसेच मोबाईलमध्ये सेफ्टी अॅप देखील ठेवावीत. प्रसंगावधान राखून या साधनांचा वापर स्वत:साठी किंवा नजरेदेखत एखाद्या महिलेवर विपरीत प्रसंग ओढवल्यास तिच्या संरक्षणार्थ वापरण्याची तत्परर्ता आपण बाळगावी. ज्युडो किंवा कराटे शिकलेल्या महिलांनी मुलींनी संकटकाळी त्यांच्याजवळी प्रशिक्षणाचा वापर करावा हे काही वेगळे सांगायला नको, मात्र जागृतीच्या अधिकाधिक मैत्रिणींनी असे स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण घ्यायलाच हवेत, कारण त्याचा फायदा स्वत:सोबत, मनाने किंवा शरीराने संकाटाला तोंड देण्यासाठी दुबळ्या ठरणा-या मैत्रिणींनाही होईल. म्हणूनच, सक्षम होऊ, सक्षम बनवू!