Gharguti Vyavsay (1)

महिलांसाठी ‘घरगुती व्यवसाय’!!

जेव्हा प्रत्येक स्त्री  स्वतःच्या नव्या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न करते, तेव्हा अर्थाने स्त्रियांचे सक्षमीकरण होईल असे म्हणता येईल; पण त्यासाठी गरज आहे आपण प्रत्येकीने सक्रियता दाखवण्याची. सगळ्यांमध्ये काहीना काही एक खासियत असते जी आपल्याला स्वतःचा शोध घेण्यासाठी उपयोगी पडते.

शिक्षणामुळे प्रगती होते आणि स्वकमाईसाठी अनेक पर्याय उपलब्ध होतात हे  अगदी खरे आहे; पण छोट्या छोट्या गोष्टींमधून घरगुती व्यवसाय उभा राहू शकतो आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एक छोटी सुरुवात होऊ शकते. आपल्यातल्या काही मैत्रिणी वेळीच जागरूक होऊन स्वतःला स्वयंसिद्ध करतात काहींना त्याचा शोध घ्यायला वेळ लागतो खरा पण काहीतरी करायची इच्छा मात्र असायलाच हवी. इच्छा असेल तर ठरवलेली कोणतीच  गोष्ट अशक्य नसते याची जाणीव असू द्यात. उणीवा प्रत्येकामध्ये असतात; पण काहीतरी करायचे आहे याची जाणीव उणीवांवर मात करू शकते.

स्वतःच्या पायावर उभं राहिल्याने एक वेगळं बळ मिळतं हे काही वेगळं सांगायला नको; पण त्यासाठी करायचं तरी काय हा प्रश्न मनाला सतत पडत असतो. यासाठी काही सोपे पर्याय खास तुमच्यासाठी देत आहोत.

पाककला :
‘सुगरण’ हि स्त्रियांना मिळालेली पदवी अतिशय योग्य आहे. घरातल्यांची मनं जिंकण्याचा मार्ग हा पोटातून जातो असं म्हणतात आणि त्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळ्या पाककृती करत असतो;पण थोडा पुढचा विचार केला तर ही तुमची पाककला तुम्हाला रोजगार मिळवून देऊ शकेल. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लोणची, पापड-कुरडया, मसाले अशा पदार्थांना तुम्ही घराबाहेरही व्यापक स्वरूप देऊ शकता. उन्हाळ्याच्या दिवसांचा यासाठी फायदा करून घ्या. त्याचप्रमाणे वेगवेगळया कंपन्यांमध्ये घरगुती जेवणाचे डबे पुरवले जातात. त्याचा शोध घेऊन तुम्ही स्वतंत्र व्यवसाय सुरु करू शकता. सुरुवातीला पूर्णवेळ करायचं नसेल तर सणासुदीला काही विशेष पदार्थांची ऑर्डर घेऊन तुम्ही प्रासंगिकरित्या व्यवसाय करू शकता.

छंदवर्ग :
आपल्याला येणाऱ्या कला दुसऱ्याला शिकवून तुम्ही कलेला प्रोत्साहन देऊ शकता. विणकाम, शिवणकाम, घरगुती ज्वेलरी बनवणे, पेपर आर्ट अशा काही छोट्या पण तितक्याच सृजनशील कला शिकवण्याचे वर्ग घ्यायला काहीच हरकत नाही. त्यातून स्वतःचे छंद देखील जोपासले जातील आणि इतरांना देखील नवीन काहीतरी शिकण्यासाठी प्रोत्साहन तुमच्याकडून मिळेल.

बचतगटामध्ये सामील होण्याचा पर्याय
स्वतः काहीतरी सुरु करण्यासाठी सुरुवातीला तयारी नसेल तर आपल्या आजूबाजूला बचतगट असतात. त्यामार्फत तुम्ही रोजगार मिळवू शकता.

घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण माहिती :

आपल्याकडे आज एकूण लघूउद्योगांपैकी कमीत कमी ९% उद्योग हे महिलांच्या मालकीचे आहेत. भांडवल हा प्रत्येक व्यवसायात कळीचा मुद्दा असतो तर त्यासाठी  बँक आणि महिलांसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था भांडवल पुरवठा संस्था असतात त्याची माहिती करून घ्या. महिलांसाठी विशेष योजना, कर सवलत अशा विविध योजना राबवल्या जातात. त्याची सखोल  माहिती करून घ्या.

मार्केटिंग आणि नफा :

मार्केटिंग आणि नफा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. ‘बोलणाऱ्याची माती विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही’ अशी एक म्हण आहे.  त्यामुळे कोणताही व्यवसाय करताना आपले प्रभावी संवाद कौशल्य उपयुक्त ठरू शकतात आणि त्यावर आपला घरगुती व्यवसाय तग धरू शकतो.

असेच, घरगुती व्यवसाय सुरु करण्याची इच्छा मनी बाळगणा-या मैत्रिणींच्या स्वप्नांना दिशा देण्याच्या उद्देशानेच आम्ही प्रशिक्षण वर्गाची शृंखला आयोजित केली. मैत्रिणींनो, तुम्ही या उपक्रमाला दिलेल्या भरघोस प्रतिसादातून तुमची स्वत:च्या पायावर उभं राहाण्याची जिद्द दिसली. लोणची, सॉस, चॉकलेट्सच्या नवनवीन रेसिपीज, तसेच ग्लास पेंटिग, प्लॅस्टिकची रांगोळी या कलाकुसरीच्या वर्गांसोबत, व्यक्तिमत्त्व विकासाचे व आर्थिक गुंतवणूकीचे मार्गदर्शन घेतलेस. अगदी स्वसंरक्षणाची तंत्रे देखील मनापासून आत्मसात केलीस. तेव्हा, आता वेळ आलीये या प्रशिक्षण वर्गांतून ग्रहण केलेल्या नव्या गोष्टींच्या सोबतीने स्वत:ला आजमावण्याची!!  तुझ्या घरगुती व्यवसायाचा श्रीगणेशा करण्याची हिच योग्य वेळ आहे, तेव्हा निर्णयाचं पहिलं पाऊल उचलं आणि संधीचं सोनं करणारी प्रगतीची वाट धर!

More Articles
Designed and Developed by SocioSquares