Jon searching (1)

नोकरी शोधताय, तर आधी हे वाचा!

लहानपणापासून घेतलेल्या शिक्षणाचे, मेहनतीचे व खर्चाचे ख-या अर्थाने सार्थक झाल्याचे समाधान देणारा क्षण म्हणजे आयुष्यातील ‘पहिली नोकरी’ आणि पुढे हीच नोकरी देणार असते पहिल्या पगाराचा आनंद! कष्टाने कमवलेल्या पैशाची किंमत समजावणारी पहिली नोकरी करताना कार्यालयातील वातावरण, तेथील नियमावली, सोबत काम करणारी मंडळी सारंच आतापर्यंत जगलेल्या शाळा किंवा कॉलेज जीवनापेक्षा फार निराळं असल्याने जरा बावरुन जायला होतं. प्रत्येकाच्या स्वभावानुसार ऑफिसमधील वातावरणाशी जुळवून घेण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात, तरीही व्यक्तिमत्त्व घडवणा-या वागणुकीतील काही बाबी मात्र, सर्वांसाठी समान असल्याने त्या सांभाळायलाच हव्यात. कॉलेजमधील मनमौजी वागण्याच्या सवयींना मुरड घालण्याची पहिली शिकवण इथेच मिळते.

ऑफिस लहान असो किंवा मोठे प्रत्येक ऑफिसचे काही नियम असतात. ज्याप्रमाणे, येण्याची वेळ, लेट मार्कची वेळ, सुट्ट्यांची गणिते ठरलेली असल्याने ती कटाक्षाने पाळायला हवीत. ऑफिसमधील सोयी सुविधांसोबत स्वत:ची कर्तव्येही नीट समजून घेणे आवश्यक आहे. या नोकरीच्या ठिकाणी व्यक्ती वरिष्ठ असो किंवा कनिष्ठ आपल्या बोलण्यात सामंजस्य असावे, तेच प्रभावी ठरते. तसेच व्यक्तिंचा स्वभाव लक्षात घेऊन त्यानुसार वागण्यात बदल करावा. ऑफिसमधील मुख्य वरिष्ठ हे कडक शिस्तीचे किंवा मनमोकळ्या स्वभावाचे असले, तरी आपले वागणे कायम मर्यादेत असेल याची काळजी घ्यावी. कामाच्या वेळेत मन लावून व अचूक काम केल्यास, तुमचा काम करण्यातील उत्साह व शिस्त नक्कीच इतरांच्या गुड बुक्समध्ये तुमचे नाव नोंदवण्यास साहाय्यक ठरेल. वरील सर्व बाबी व्यक्तिमत्त्व प्रभावी बनवतात व प्रामाणिकपणे नोकरी करण्याचा संदेशही देतात, मात्र या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांभाळायला हवी म्हणजेच, नोकरी करताना थोडे सतर्कही रहायला हवे. दृष्ट प्रवृत्तींना बळी न पडता सावधगिरीने वागावे. एखादी व्यक्ती तुमच्याशी उगाच जास्त सलगीने वागत असेल तर योग्य वेळी अशा लोकांपासून जरा दूर रहाण्याचा मार्ग स्वीकारणेच फायदेशीर ठरते.

पहिली नोकरी करताना येणारं दडपण आत्मविश्वासाच्या बळावर दूर सारता येईल, तसेच नोकरीतील नव्याचे नऊ दिवस संपल्यावर त्याच त्याच कामाचा कंटाळा येण्याच्या समस्येवरील गुणकारी उपाय म्हणजे, ‘कामाचा आनंद घेत रहाणे’!

More Articles
Designed and Developed by SocioSquares