एकोप्याचे ‘वाण’ हळदी कुंकू!

एकोप्याचे ‘वाण’ हळदी कुंकू!

देशातील विविध राज्यांमध्ये माघी संक्रांत, सोंक्रन, पोंगल, लोहरी अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधला जाणारा मकर संक्रांतीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करुन त्याचे उत्तरायण सुरु होते, तसेच हे उत्तरायण सुरु झाल्यावर पितामह भीष्मांनी स्वेच्छेने आपला देह ठेवला ही दंतकथा देखील प्रचलित आहे. नात्यातील कटूता विसरुन त्यात माधुर्य पेरण्याची संधी देणारा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण म्हणजे ‘मकर संक्रांत’! ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे म्हणत लहान थोर सारेच तीळाचे लाडू, तीळाच्या वड्या, गूळपोळी अशा पौष्टिक पदार्थांचा आस्वाद घेतात.

पहिली मकर संक्रांत असणा-या नवविवाहित जोडप्याला गोड हलव्यापासून बनविलेल्या दागिन्यांनी सजवून त्यांचा कौतुक सोहळा पार पडतो. घरातील सुवासिनी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची मनोभावे पूजा करतात. ‘सुगडे’ म्हणजे छोटे मडके, यामध्ये धन धान्य, सोबत उसाचे काप, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं, तिळगूळ अशा जिन्नसांनी सुगडे भरुन त्याला हळद कुंकू लावून त्यांची पूजा केली जाते. या पूजेनंतर गृहिणी मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सवडीप्रमाणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आखतात व वाण घेण्यासाठी आपल्या मैत्रिणींना आमंत्रित करतात. घरी आलेल्या मैत्रिणींना दिली जाणारी भेटवस्तू म्हणजेच ‘वाण’!

गेली वर्षानुवर्षे सुरु असणा-या या परंपरेमागे स्त्रियांनी एकत्र येण्याचा सामाजिक उद्देश दिसून येतो. पुर्वीच्या स्त्री वर्गाची परिस्थिती पाहाता धार्मिक कारण असल्याशिवाय स्त्रियांना घराबाहेर पडण्यास मुभा नव्हती. त्यामुळे, हळदी कुंकवानिमित्त एकमेकांच्या घरी जाण्याने होणा-या गप्पा गोष्टी यातून वाढणारा सलोखा उपयुक्त ठरला. सध्या स्त्रिया उत्साहाने मैत्रिणींचा ग्रुप तयार करुन एखादे मंडळ स्थापन करतात आणि या माध्यमातून वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम, सहली, भिशी सारखे गुंतवणूकीचे उपक्रम देखील राबवतात. ज्यामुळे, घराच्या चौकटी सांभाळत स्वविकास करु पाहाणा-या महिलांना समविचारी मैत्रिणी मिळतात; ज्या मिळून घरगुती व्यवसायावर एकत्रितरित्या काम करतात व सोबत विरगुंळाही होतो. ‘गोड गोड बोला’ असे सांगणारी मकर संक्रांत विचारांची देवाण घेवाण करीत आप्तेष्टांशी नात्याचा बंध जपण्याचा महत्त्वाचा संदेश देते व स्त्रियांना धार्मिक कारणाने एकत्र आणणारे ‘हळदी-कुंकू’ देखील यशस्वी होते!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares