makar 1

नात्यांवर संक्रांत न येऊ देणारी मकरसंक्रात!

हिंदू धर्मात वर्षभर येणा-या विविध सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे ‘मकरसंक्रांत’!! लोकांचा छळ करणा-या संकरासूर राक्षसापासून संक्रांती देवीने लोकांची सुटका करुन त्यांना सुखी केले, या प्रचलित मिथ्यकथेची पार्श्वभूमी या सणाला लाभलेली आहे, तसेच वैदिक शास्त्रानुसार या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो, म्हणून या तिथीला मकरसंक्रांत साजरी करण्याचे हे आणखी एक कारण मानले जाते. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ असे म्हणतात, पूर्वी या दिवशी अभ्यंगस्नान केले जाई व स्त्रिया सकाळी लवकर उठून संपूर्ण अंगण शेणाने सारवून सुशोभित करीत. वर्षभरात येणा-या सणांचा क्रम ऋतूंशी साजेसा असून, त्या सणांना बनवले जाणारे पदार्थ देखील शरीरासाठी पौष्टिक असतात. संक्रांतीला तीळ, गूळ, खसखस, सुके खोबरे, शेंगदाणा या सर्व स्निग्ध पदार्थांचा वापर केलेले तीळाचे लाडू, वड्या, गूळपोळी अशा शक्तिवर्धक पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. ‘तीळ’ उष्ण असल्याने थंड हवामानात शरीरासाठी आवश्यक असणारी ऊर्जा ‘तीळगूळ’ या पदार्थातून मिळते व हा लाडू कुणालाही देताना ‘तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे म्हणण्याची पद्धत नाती जपण्याचा आग्रह धरते.

विविध रुढींनी परिपूर्ण असलेल्या या सणाने कुटुंब, नातेसंबंध या परंपरेला अधिक महत्त्व दिलेले दिसते. फक्त एक दिवस नाही, तर वर्षभर सर्वांशी सामंजस्याने वागण्याचा संदेश या सणाद्वारे दिला जातो. तीळातील स्निग्धता म्हणजे स्नेह व मैत्री यांची गोडी वाढविण्यासाठी तिळगुळाची देवाणघेवाण करीत नवीन स्नेहसंबंध जोडायचे, जुने अधिक दृढ करायचे, तर दुरावलेली नाती पूर्ववत करण्याची संधी देणारा सण म्हणजे ‘मकरसंक्रांत’!

सध्याच्या टेक्नोलॉजीच्या विश्वात नात्यांमधील ओलावा टिकवून ठेवण्याचे मोलाचे कार्य करणा-या या मंगलदायी सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

More Articles
Designed and Developed by SocioSquares