Nauwari (1)

नखरेल नऊवारी!

भारतातील संस्कृतीत स्त्रियांच्या पेहरावात मानाचे स्थान मिळवलेली ‘साडी’, या साडीचे अनेक प्रकार असून, प्रत्येक साडीच्या वैशिष्ट्यांवरुन तिची नावे ठरलेली आहेत. यामध्ये साडीचा पोत, रचना, तिचे डिझाईन, तसेच ब-याचदा ती साडी कुठे बनलेली आहे, त्या गावावरुन किंवा राज्यावरुन तिचे नाव ठेवलेले दिसते. साडी म्हटलं की, प्रथम डोळ्यासमोर येतं मोठ्या लांबीचं कापड! उदाहरणार्थ, चारवारी जिला बेबी साडी असेही म्हणतात, पाचवारी, सहावारी, नऊवारी किंवा दहावारी अशा लांबीमध्ये साड्या उपलब्ध असून तिच्या नेसण्याच्या पद्धतीही त्यानुसार बदलतात. या साडी प्रकाराची परंपरा फार जुनी असून २१व्या शतकातील बदलत्या जीवनशैलीसोबत साडीचे नवनवीन प्रकार उदयाला आले, मात्र सर्वांत जास्त लोकप्रिय ठरली ती गोलाकार नेसली जाणारी ‘पाचवारी साडी’! धावपळीच्या जीवन पद्धतीने कामे अधिक जलद करण्याची जणू स्पर्धाच लागली, ज्यामध्ये साडीला सलवार कमीज्, जीन्स-टॉप असे पर्याय आले तरी, साडी आपले अस्तित्त्व टिकवून राहिली व गोलाकार पद्धतीची पाचवारी साडी जणू विजयी ठरली.
या सा-या चढ उतारांमध्ये पुन: नव्याने प्रसिद्धीस आलेली नऊवारी साडी सध्याचा फॅशन ट्रेंड ठरलेली दिसते. कोळी, ब्राम्हणी, मराठा, पेशवाई व लावणी या नऊवारी साडी नेसण्याच्या काही पद्धती प्रचलित आहेत. नऊ ‘वार’ असणारी ही भली मोठी साडी चापून चोपून नेसावी लागते. ही साडी कशी नेसावी हे बहुतांश स्त्रियांना माहित नसल्याने या साडीचा पर्याय ब-याचदा नाकारला जातो, मात्र मागील काही वर्षांत मापाने शिवून मिळणारी ‘स्टिच्ड’ नऊवारी आली व पारंपारिक फॅशनचा अविभाज्य भाग बनली. ‘आजीची साडी’ अशी ओळख असलेली नऊवारी हल्लीच्या तरुणींमध्ये भलतीच पसंतीची झालीये.
रेडीमेड साडी हा पर्याय उपलब्ध झाला असला, तरी साडी घालण्यापेक्षा ती नेसण्याची मज्जा काही औरच असते. विविध वेबसाईटवर ‘नऊवारी साडी कशी नेसावी?’ याविषयी दिलेली माहिती किंवा व्हिडीओज् तुम्हाला मार्गदर्शन करतील तसेच, काही ठिकाणी नऊवारी साडी नेसण्याच्या शिकवण्याही उपलब्ध आहेत. त्यामुळे, आता तुम्ही स्वत:हून ही साडी नेसू शकता, पण कामाच्या व्यापामुळे जर रेडीमेड नऊवारीचा पर्याय निवडत असाल, तर तोही हमखास हिट ठरेल यात शंकाच नाही. तुमचा कॉलेजमधील ‘साडी डे’ आता ‘नऊवारी’ अधिक खास बनवेल तसेच, सध्या लग्न सोहळ्यांचा मास सुरु असल्याने तुम्ही नऊवारी साडीला प्राधान्य नक्कीच देऊ शकता किंवा लग्नामध्ये तुमच्या ग्रुपची थीम ‘नऊवारी व त्यासोबत शोभिवंत असे पारंपारिक दागिने’ अशी ठेवल्यास नुसत्या पेहरावानेच विरुद्ध पक्षापुढे तुमचे पारडे जड होईल यात शंकाच नाही! या साड्यांमध्ये रंगांचे व डिझाईन्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. चौकडीच्या डिझाईन्सपासून बुट्ट्यांच्या खास नक्षी, सोनेरी पदर असा नऊवारीचा खानदानी साज छानच दिसेल! तेव्हा, नऊवारी साडीच्या हटके लूकच्या सोबतीने बनवा सोहळ्यास अधिक स्पेशल!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares