‘व्हॅलेन्टाईन्स डे’ भारतीय!!

‘व्हॅलेन्टाईन्स डे’ भारतीय!!

भारतीय संस्कृतीत रुढ होऊ पाहात असलेला  व पाश्चात्य संस्कृतीत सणाचे महत्त्व प्राप्त झालेला एक प्रेमळ दिवस म्हणजे  ‘व्हॅलेन्टाईन्स डे’! १४ फेब्रुवारीच्या कित्येक दिवस आधीच दुकाने लाल रंग परिधान करीत नटलेली असतात, तर तरुणाईचा दिवस म्हणून ओळखला जाणारा हा व्हॅलेनटाईन्स डे साजरा करण्यात महाविद्यालये गढून जातात. परदेशांतून आलेला हा ‘डे’ थोरांना निव्वळ दिखावूपणा वाटला, तर संस्कृतीत न बसणारा असे म्हणत त्यास खूप विरोधही झाला. मात्र, अनेक वर्षांनी टिका टिप्पण्यांना सामोरे गेलेल्या या प्रेमळ दिवसाचा तरुणांव्यतिरिक्त आता प्रौढ भारतीयांनी देखील स्वीकार केलेला दिसतो.

हा दिवस प्रियकर आणि प्रेयसी या नात्यासाठी मर्यादित न मानता आता प्रौढ मंडळीही मित्र, भावंडं किंवा घरापासून दूर असणारे नातेवाईक यांच्याविषयीची आपुलकी व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे निमित्त साधतात. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून एकमेकांविषयीचा आदर व्यक्त करणारे संदेश पाठवून शुभेच्छाही देतात. आई वडीलांसाठी त्यांची मुले व्हॅलेन्टाईन गिफ्ट देतात तर, नांतवंडे आजी-आजोबांना व्हॅलेन्टाईन गिफ्ट देतात. अशाप्रकारे, कुठल्याही नात्यांच्या सीमा न बाळगचा आपल्या माणसांना आनंदी करण्यासाठी विविध वयोगट यामध्ये सहभागी होतात. याचसोबत, लाफ्टर क्लब, जेष्ठांचे समूह, महिलांचे कॉलनीतील ग्रुप्स किंवा भिशी ग्रुप्स, शाळेतील जुने मित्रमंडळी आपल्या दोस्तांसाठी हा दिवस राखून ठेवतात. या दिवशी छोटे ‘गेट टू गेदर’ किंवा ‘स्नेह भोजन’ असा बेत ठरवण्यासाठी ‘व्हॅलेनटाईन डे’चे निमित्त साधतात. खास त्या दिवशी कपड्यांसाठी लाल रंगाची थीम देखील ठरवली जाते व ग्रुपमधील सदस्य मोठ्या उत्साहाने त्याचा स्वीकार देखील करतात.

व्यस्त जीवनातून आपल्या व्यक्तिंसाठी थोडा वेळ काढत, त्यांच्याशी प्रत्यक्ष साधलेला संवाद नात्यांसाठी नेहमीच पोषक ठरतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठल्याही विशिष्ट दिवसाची किंवा तारखेची आवश्यकता नसली, तरी नव्या प्रवाहात सामील होत स्वत:च्या मनाला रुचेल तितकाच बदलत्या संस्कृतीचा स्वीकार करुन, त्यास आपल्या पद्धतीचा साज देणे नक्कीच आनंददायी ठरेल. ज्याप्रमाणे, मूळच्या परदेशी असणा-या व्हॅलेन्टाईन डेचे हे भारतीय रुप बनले आहे खास!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares