रामबाण उपायांची ‘अर्थक्रांती’!!

बनावट आणि काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला आणि काळे धन जपलेल्या बड्या लोकांची भंबेरी उडाली, तर सर्वसामान्यांची छोट्या रक्कमेचे व्यवस्थापन करताना एकच तारांबळ उडालेली दिसते. या बाद झालेल्या मोठ्या रक्कमेच्या नोटांमुळे सुट्या पैशांची मागणी वाढली आणि रोजच्या व्यवहाराला लागणारा खर्च चालवणे देखील जिकरीचे झाले. बॅंका व ए टी एम समोर लागलेल्या रांगा तर अजूनही कमी झालेल्या नाहीत. या नव्या निर्णयामुळे घाबरुन किंवा गोंधळून न जाता प्रथम त्याविषयी योग्य व अचूक माहिती करुन घेणे गरजेचे आहे, असे केल्याने नोकरी, व्यवसाय व रोजच्या दिनक्रमातून बॅंकेच्या व्यवहारासाठी वेळ राखून ठेवता येईल व कुठलेही नुकसान होणार नाही. यासाठीच या नियमाविषयी दिलेली खालील माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल,

1. रेल्वे स्थानक, रुग्णालये, बस स्थानक, एअरपोर्ट अशा ठिकाणी जुन्या नोटा वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, औषधे खरेदीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी गरजेची आहे.

2. ५०० व १००० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅंकेची सर्व कार्यालये, बॅंक शाखा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बदलून मिळतील.

3. जमा केलेली रक्कम तुमच्या नावावर सुरक्षित असेल, तुम्हाला यामध्ये कुठलाही तोटा होणार नाही.

4. जुन्या नोटांच्या बदल्यात लगेच संपूर्ण रक्कम मिळणार नसून प्रति व्यक्ती चार हजार रुपये मिळतील.

5. ए टी एम, कॅश डिपॉझीट मशीन यांच्यामार्फत पैसे जमा करु शकता.

6. चेकने पैसे काढण्याची कमाल मर्यादा दिवसाला १० हजार व आठवड्याला २० हजार रुपये एवढीच आहे. २० नोव्हेंबरपर्यंत ही मर्यादा लागू आहे.

7. ३० डिसेंबरपर्यंत नागरिकांना पाचशे व हजारच्या नोटा बदलून मिळणार आहेत.

8. याविषयीची अधिक माहिती तुम्ही वाचू शकता www.rbi.org.in या वेबसाईटवर.

तसेच, या निर्णयाविषयी तुमच्या आणखी काही समस्या असल्यास तुम्ही आरबीआयच्या publicquery@rbi.org.in या ईमेल आयडीवर तुमची समस्या पाठवू शकता.

वर्तमानपत्र, टिव्ही, रेडीओ, मोबाईल आणि सर्वांत महत्त्वाचं ‘इंटरनेट’ सारख्या माध्यमांतून या नियमाविषयीची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचते आहेच, तरी या नव्या मिडियापासून वंचित असणा-यांपर्यंत या निर्णयाची अचूक नियमावली पोहोचवूया. साक्षरतेचा आकडा वाढता असला, तरी लिहिता वाचता न येणारे अनेक वयोवृद्ध या सुशिक्षित व पुढारलेल्या समाजात एकट्याने जीवन कंठीत आहेत. त्यांची बॅंकेची कामे करुन देण्यात साहाय्य करुया. तसेच, हातावर पोट अशी अवस्था असणा-यांचे बरेचदा बॅंकेत खाते देखील नसते, अशा व्यक्तिंना बॅंकेत खाते उघडण्याविषयी माहिती देऊन वेळीच सतर्क करुया. स्वच्छ भारत अभियानासोबतच देशातील भ्रष्टाचार स्वच्छ करण्याच्या या मोहिमेअंतर्गत हाती घेतलेल्या अर्थक्रांतीचा आदर करुया व वरील उपयुक्त माहिती न मिळाल्याने कुणा गरजूचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊया.

More Articles
Designed and Developed by SocioSquares