Share Market (1)

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना!

बरेचदा ‘जुगार’ आणि ‘शेअर’ यांना समान पातळीवर पाहिले जाते, मात्र ‘शेअर’ जगताची संपूर्ण माहिती झाल्यास हा गैरसमज दूर होऊ शकतो. यासाठी शेअर मार्केट म्हणजे काय? हे समजून घेणे आवश्यक आहे. शेअर बाजाराविषयीच्या अनेक गैरसमजूतींमुळे काही लोकं या सा-यापासून जरा दूर राहाणेच पसंत करतात. ज्यामुळे, उत्पन्न वाढवण्याच्या संधीकडे देखील दुर्लक्ष होते. ‘शेअर’ हे शेअरधारकाला कंपनीची मालकी प्रदान करतात. म्हणजेच, प्रथम शेअरधारक कंपनीत पैसे गुंतवतो व नंतर कंपनीने कमवलेल्या नफ्यातील हिश्याची मागणी करण्यास तो पात्र ठरतो. शेअर म्हणजे कंपन्यांमधील स्पर्धा, ज्यांमध्ये सतत चढा-ओढ सुरु असते व प्रत्येक कंपनी स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करते. शेअर बाजाराच्या यादीत समाविष्ट असलेल्या कंपनींची नावे, बाजारातील त्यांचे स्थान याची माहिती गुंतवणूकदारांना सहज उपलब्ध असते. ज्याच्याआधारे, गुंतवणूकदार कंपनीच्या बाजारातील स्थानाचा अभ्यास करु शकतो व शेअर खरेदी करण्याची व तो विकण्याची योग्य वेळ निवडतो. यासाठी, ज्या कंपनीचे शेअर विकत घेतले आहेत त्या कंपनीच्या नफ्या तोट्याच्या आकड्यांवर शेअरधारकांना लक्ष ठेवावे लागते.

‘शेअर बाजार हा श्रीमंतांसाठी’ असा विचार करुन ब-याचदा मध्यमवर्गीय यामध्ये पैसे गुंतवणे टाळतात. मात्र, या व्यवहारात श्रीमंत गरीब असे कुठलेही बंधन नसून लहान शेअर पासून सुरुवात करीत गुतंवणूकीची रक्कम हळू हळू वाढवीत नेऊ शकतो. मात्र, या क्षेत्राचा विचार करण्याआधी शेअर बाजाराचा सविस्तर अभ्यास हवा व सावधरित्या निर्णय घेण्याची क्षमता असणे देखील गरजेचे आहे. गुंतवलेल्या पैशांवर नफा मिळवणे हाच प्रत्येकाचा उद्देश असतो यात शंका नाही मात्र, हा नफा मिळवताना अधिकतम फायद्यासाठी थांबायचे की, कमी नफ्यात वेळीच शेअर विकायचे या द्वंदातून योग्य पर्याय निवडणे आवश्यक असते. यासाठी तुम्ही ज्या कंपनीचे शेअर विकत घेतले आहेत त्या कंपनीची पार्श्वभूमी, तिची उत्पादने व सेवा, सद्यस्थितीला व भविष्यात त्या कंपनीला होणा-या आर्थिक नफ्या तोट्याचा अंदाज बांधता यायला हवा, तुमचा हा गृहपाठ पक्का असेल, तर ‘शेअर बाजाराचा व्यवहार करणे’ समजून घेता येईल. शेअर बाजारातील कंपन्यांची माहिती देणा-या अधिकृत साईटस् इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ज्यावर ही कंपनीची शेअर बाबतची आकडेवारी उपलब्ध असते. शेअर मार्केटद्वारे गुंतवणूकदार कंपनीला पैशाचे पाठबळ देतात, ज्यामुळे या पैशांच्या उलाढालीत कंपन्यांसोबत देशाची आर्थिक सत्ता देखील सक्षम होण्यास मदत होते. शेअर मार्केटच्या व्यवहारात प्रवेश करण्याआधी तो काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares