KELICHE PAN (1)

केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे!

‘आधुनिक’, ‘नवे’ किंवा ‘ट्रेंडी’ अशा बदलत्या जीवनशैलीने आपली आहार संस्कृतीही व्यापली आहे. झटपट बनवता येणा-या पदार्थांपासून मनात येताच ऑर्डर केलेली गरमागरम डीश समोर असण्यापर्यंतचे आरामदायी पर्याय आता उपलब्ध आहेत. दिवसभरातील कामाच्या थकव्यानंतर स्वयंपाकघरातील कामास असा शॉर्टकट देणे नेहमीच हवेसे वाटते. घरात एखादे धार्मिक कार्य किंवा सोहळा असल्यास जेवण व त्यानंतरचे आवरण्यात वेळ जाऊ नये यासाठी रेडीमेड ताटापासून सारेच आयते आणण्यास पसंती मिळते, असे केल्याने सोहळ्यात पूर्ण सहभागी होता येत व घरी आलेल्या पाहुण्यांना पुरेसा वेळही देता येतो. थोडं मागच्या काळात डोकावल्यास केळीच्या किंवा पळसाच्या पत्रावळ्यांचा ताटासारखा केला जाणारा वापर हल्ली फारच दुर्मिळ झाला आहे.

जेवणासाठी या पानांचा वापर करण्यामागील आयुर्वेदिक कारणे समजून घेतल्यास त्या परंपरेचे महत्त्व लक्षात येईल.

  1. केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने पानांतील पोषकतत्त्वे अन्नात मिसळतात, जी शरीरासाठी उपयुक्त ठरतात.
  2. केळीच्या पानांतील आरोग्यदायी एन्टीऑक्साईड्स दिर्घकाळ त्वचेला तजेलदार ठेवतात.
  3. केळीच्या पानांवर जेवल्यास डाग, खाज, पुरळ अशा समस्या दूर होतात.
  4. पळसाच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळी व द्रोण असेच गुणकारी असून ते शिवण्यासाठी वापरल्या जाणा-या लिंबाच्या काड्याही औषधी गुणांनी समृद्ध असतात.
  5. जेवणास स्वादिष्टता देणारी पळसाची पत्रावळ, अन्न पचनास मदत करणारी देखील आहे.

पर्यावरण रक्षणाचा विचार करता झाडांच्या पानांचा असा वापर करण्यास नकार दिला, तरी त्याऐवजी वापरल्या जाणा-या थम्राकॉल किंवा प्लॅस्टिकच्या ताटांची विल्हेवाट लावणेही कठीण आहे. ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा या परिस्थितीवर ‘झाडे लावणे’ हा सुवर्णमध्य ठरेल का? कदाचित यामुळे पळसाच्या पानांची पत्रावळ बनविणा-या हातांना पुन्हा उद्योग मिळू शकेल, तसेच केळीच्या झाडांची लागवड करणे कमी जागा व्यापणारे व सोप्पे असल्याने इमारतीच्या परिसरात देखील ही झाडे लावता येतील.

झपाट्याने बदलणा-या संस्कृतीने स्विकारलेल्या नव्या पायंड्यातील फायदे व तोटे जाणून वेळीच सावध व्हायला हवे आणि पूर्वीच्या पारंपारिक रुढींचे वैज्ञानिक महत्त्व जाणून योग्य पर्यायाची निवड करायला हवी. चला तर मैत्रिणींनो, पर्यावरण विचारांची आयुर्वेदाशी सांगड घालू!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares