नववर्षी ‘स्वसंरक्षणाचा संकल्प’!

नववर्षी ‘स्वसंरक्षणाचा संकल्प’!

२०१७ चे अगदी दणक्यात स्वागत झाले ना! मित्र मंडळी, नातेवाईक यांची सोबत देणारी छोटी मोठी गेट टू गेदर्स, येथे प्रत्येकाचा उत्साह व्यक्त करण्याचा अंदाज निराळा असला, तरी निमित्त एकच होते येणा-या नवीन वर्षाच्या स्वागताचे! दर ३६५ दिवसांनी नवीन वर्ष येतेच, पण यंदाचे वर्ष देशभरातील नागरिकांच्या विचारांनाच दणका देत आले. ३१ डिसेंबरच्या रात्री सर्वत्र वर्ष स्वागताचा जल्लोष सुरु असताना बंगळूर येथे मुलींच्या छेडछाडीच्या घडलेल्या घटनेमुळे भारतीय स्त्रियांनी ठरवलेल्या नववर्षाच्या संकल्पांमध्ये स्वसंरक्षणाचे शिक्षण घेण्याच्या संकल्पाची भर पडली असेल.

वर्षभर स्त्रियांवर होणा-या अन्यायाच्या बातम्या ऐकून आपल्याला चीड येते, समाजात वावरणा-या विकृत शक्तींचा रागही येतो. मनातील या भावना व्यक्त करण्यासाठी प्रतिक्रिया देण्याची इच्छा आपण नक्कीच पूर्ण करु शकतो आपल्या नववर्षासाठीच्या पुढील संकल्पातून! स्त्रीने स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षणाच्या काही महत्त्वाच्या कसबी शिकून घ्यायलाच हव्यात, कारण हीच आजच्या काळाची गरज आहे. सामाजिक भान राखणा-या अनेक संस्थांद्वारे खास महिलांसाठी स्वसंरक्षणाच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात त्यामध्ये सहभागी व्हायला हवे. नोकरीसाठी घराबाहेर पडणा-या स्त्रियांना ट्रेनच्या प्रवासापासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत दुर्दैवाने लैंगिक शोषणाच्या अनुभवांचा सामना करावा लागतो, अगदी बाजारातील गर्दी देखील याला अपवाद नाही. अशा दैनंदिन जीवनातील लहान मोठ्या घटनांचा सामना करताना देखील स्त्रीला सतर्क राहावे लागते. यासाठीच, शक्तीपेक्षा युक्तीने अन्यायाला लढा देण्याचा मार्ग स्विकारायला हवा!

शिक्षण, क्रिडा, कलाकौशल्य क्षेत्र कुठलेही असो ‘ती’ आपल्या गुणकौशल्याच्या जोरावर आघाडीचे नवे विक्रम रचते आहे. येणा-या नवीन पिढीसोबत संपूर्ण महिलावर्गाने अन्यायाविरुद्ध मदतीची याचना करण्यापेक्षा परिस्थितीशी दोन हात करण्याचे धाडस कमवून स्वत:ला सक्षम करण्याचा संकल्प पूर्णत्वास न्यायला हवा!!

Image source – http://bit.ly/2kKPcV4

More Articles
Designed and Developed by SocioSquares