mi-mazi-swachandi

मी माझी स्वच्छंदी!

मैत्रिणींनो! तुम्हला असे प्रश्न पडले आहेत का, आपल्या आवडीचा रंग कोणता? आवडीचं ठिकाण कोणतं? पदार्थ कोणता? मिळालीत का या प्रश्नांना उत्तरं? बऱ्याचजणींकडे याची उत्तरं नाहीत किंवा असं विचारलं तर खूप वेळ आठवून मग उत्तरं मिळतील. अशी परिस्थिती असण्याचं एकमेव कारण आपण स्वतःला तसे प्रश्न विचारलेच नाहीत म्हणजेच आपण स्वतःला पुरेसा वेळच दिलेला नाही.

कधीतरी एकटंच निवांतपणे पुस्तक वाचत बसावं, कधीतरी नेहमीपेक्षा जरा जास्तचं झोप घ्यावी, चहा किंवा कॉफीचा आनंद घेत खिडकीपाशी बसावं, एखादं गाणं लावून ते निवांतपणे ऐकावं, आवडत्या फुलांचा गजरा करून अगदी नाभीच्या देठापासुन त्याचा सुगंध मनात साठवून घ्यावा. किती रम्य कल्पना आहेत, नाही का? पण या प्रत्यक्षात उतरवायला काय हरकत आहे.

आजुबाजूच्या गच्च गर्दीत हात, नाक, तोंड घट्ट बांधून ठेवल्यासारखं वावरणाऱ्या आपण, आज मनाला तरी या बंधनातून सोडवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो. रोजच्या रोज हे करणं कदाचित शक्य होणार नाही पण कधीतरी थोडा स्वत:साठी वेळ द्यायला काय हरकत आहे?

आता हे वाचताना तुमच्या मनात येणं अगदी स्वाभाविक आहे की, ‘रोजचा दिवस उगवतो कधी आणि मावळतो कधी ते आमचं आम्हालाही कळत नाही’,’इथे घरातल्यांच्या मागे धावता धावता स्वतःच्या मनाचा विचार कधी करता येतंच नाही;पण खरं सांगू का, हा असा विचार मनात येतो कारण आपण आपल्याला वेळ देण्यासाठी कधी प्रयत्न करतच नाही. स्वतःला झोकून देत नाही स्वतःमध्ये. आजुबाजूच्या लोकांमध्ये इतकं हरवतो की शोध लागत नाही स्वतःला स्वतःचाच! म्हणूनच मैत्रिणींनो, आपण स्वतःला स्वतःची साथ देण्यासाठी सज्ज होत असू तर आपल्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक आहे.

कधीतरी एखादी जुनी डायरी सापडते आणि नकळत आपण मनाशी बोलतो, ‘किती छान लिहायची मी’, जुना अल्बम सापडतो आणि सहज हसु येतं ना ओठावर. सहाजिकचं आहे कारण ते क्षण आपण आपल्यासाठी जगलेलो असतो, त्यावर फक्त आणि फक्त आपला हक्क असतो. मग आता काय हरकत आहे. आता देखील परिस्थिती फार बदलली नाही. आजही एखादी नवी कोरी डायरी किंवा आधीचीच जुनी डायरी घेऊन तर बघा, कदाचित तेव्हा सुरु केलेली एखादी कविता किंवा लेख आता पूर्ण होऊ शकेल.

वयाच्या कुठलाच टप्पा माणसाला म्हातारपण देत नाही फक्त त्याचं मन चिरतरुण असायला पाहिजे आणि चिरतरुण राहण्यासाठीच आज गरज आहे आपल्या मनाप्रमाणे जगण्याची! आज हीच गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटतेय. आपल्याला हवं तसं जगा. मग बघा.. किती मनमोकळा श्वास घेता येईल. काही कल्पनेत वाटणाऱ्या गोष्टी देखील प्रत्यक्षात आल्याचं समाधान मिळेल आणि तुम्ही देखील अगदी आनंदानं म्हणाल ‘मी माझी स्वच्छंदी..!

Designed and Developed by SocioSquares