Banner 01

आदर्श राजमाता ‘जिजाऊ’!

राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील लखूजीराजे जाधव या प्रसिद्ध राजघराण्यात झाला. लखुजीराज्यांनी आपल्या कन्येस म्हणजेच जिजाऊस देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती अशा विविध गुणांनी परिपुर्ण असणारे जिजाऊंचे व्यक्तिमत्त्व! त्यांनी विवाहानंतर स्वराज्य संकल्पनेला अखंड स्वरुप प्राप्त करुन देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. केवळ जाहागिरी किंवा वतन टिकवून ठेवण्याचा संकुचित विचार न करता प्रजेला न्याय मिळायला हवा हीच त्यांची भूमिका होती. शहाजीराजांच्या कार्यात जिजाबाई अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. आदिलशहा, निजाम, मुघल असे बलाढ्य शत्रु विरोधात असताना देखील राजमाता मोठ्या निर्भिडपणे त्यांच्यासमोर उभी ठाकली. राजेशाही बाज, राजघराणी याहीपेक्षा त्यांनी रयतेचा विचार अग्रणी ठेवून कार्य केले.

जिजाबाई यांच्याजवळील या सा-या सदगुणांची व विचारांची दूरदृष्टी शिवबांना त्यांच्या आईकडूनच मिळाली. ‘शिवबा’ ते ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा यशस्वी प्रवास घडवणा-या या मातृवत्सलेने आपल्या सुपुत्राला स्वराज्य निर्मितीचे धडे दिले, ज्यामधून उभे राहिले यशस्वी साम्राज्य!

‘आई’ तेव्हाची असो किंवा आत्ताची, ती आपल्या बाळाला चांगले संस्कार देण्यासाठीच प्रयत्नशील असते. धाडस, सहनशीलता, कल्पकता, समाजभान, परोपकारी वृत्ती अशा अनंत गुंणाचा समुच्चय आजच्या ‘ती’मध्ये देखील आहे.  गरज आहे ‘स्त्री’ ला तिच्यामधील शक्तीचे सामर्थ्य समजून घेण्याची, जिजाबाई म्हणजे याच स्त्री शक्तीचे तत्कालीन देखणे रुप! महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास साकारणा-या या मूर्तिमंत व्यक्तिमत्त्वास झी मराठी जागृतीचा मानाचा मुजरा!!

Designed and Developed by SocioSquares