Inspiration > RJ अनघा मोडक – दृष्टीहीन दिव्यदृष्टी
Anagha Modak Banner

RJ अनघा मोडक – दृष्टीहीन दिव्यदृष्टी

संकटे कोणाच्या आयुष्यात नसतात हो, आयुष्य म्हणजे सुख आणि दुःख यांच्या रहाटगाड़ग्याचा खेळच जणू. पण त्या संकटांना झेलणे आणि त्यांना तुम्ही कसे प्रतिसाद देता यावर अवलंबून असते. त्यांना आपल्यापाशीच कवटाळून रडायचं की त्यांचा सामना करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहायची हे फक्त आपल्याच हातात आहे.

अनघा मोड़क, एक स्वच्छंदी मुलगी. तिचा जन्म मुंबईतील विलेपार्ले येथे झाला. वडील बँकेत कामाला, आई गृहिणी तसेच एक लहान भाऊ असे तिचे कुटुंब. तिचे बालपण मजेत गेले. तिने पुण्यातून पत्रकारिता या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्याचसोबत तिने मुंबई विदयापीठामधून कला शाखेतील पदवी संपादित केली. तिला गायनाची पण आवड, गांधर्व महाविद्यालयाच्या 3 परीक्षा अत्यंत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली. तसेच तिला वाचनाची आवड़, लिखाण करण्याची त्याहून जास्त आवड़, तसेच मनसोक्त फिरण्याचीही आवड़ होती.

सगळ काही व्यवस्थित सुरु होते. पण अचानक नियतीचे फासे असे काही उलटे पडले आणि दिनांक 2 ऑक्टोबर 2014 रोजी तिला डेंगू या आजाराने ग्रासले. दिवसेंदिवस तिची प्रकृती जास्तच खालावत चालली. 5 दिवस झाले तरी प्रकृतीत काही सुधारणा नाही. 7 ऑक्टोबर 2014 ला तिचे डोळे आणि डोके प्रचंड दुखत होते, अशातच तिची दृष्टी कमकुवत झाली आणि अवघ्या 4 तासात तिची दृष्टी पूर्णपणे गेली. तिच्या आणि तिच्या घरच्यांवर आभाळ कोसळले. तिला हॉस्पिटल मध्ये तिचे गुरु भेटायला आले असता असे म्हणाले कि “इतके दिवस बाहेर बघत होतीस, आता काही दिवस तुला तुझ्या आत बघायचे आहे”. या एका वाक्याने तिचे जीवनच बदलले आणि आशेचा एक मोठा किरण तिला मिळाला.

आपण स्वप्नं बघत असतो, पण अचानक एका दिवसात आपल्या स्वप्नांचे पुस्तक बंद व्हावे याप्रमाणे अनघाच्या बाबतीत झाले. पण ती मुळीच खचून गेली नाही. तिच्या घरच्यांनी सुद्धा तिला खूप आधार दिला. तिला होणा-या वेदनांच्या संवेदना त्यांनी सहवेदना म्हणून जाणल्या. त्यानंतर कमलेश भड़कमकर याने तिला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्याची संधी दिली. ज्याचे सलग 3 कार्यक्रम तिने केले. याच कार्यक्रमावर आधारित तिने सावरकर यांच्यावर सलग 2 तास व्याख्यान केले. याच दरम्यान आकाशवाणी येथे रेडिओ जॉकी म्हणून सुद्धा तिची निवड झाली. 2 वर्षात तिने आकाशवाणीचे तब्बल 16 कार्यक्रम केले आणि अशा रीतीने अनघा ही RJ अनघा मोड़क म्हणून नावारूपास आली. एबीपी माझा चे राजीव खांडेकर यांनी तिला माझा संघर्ष या कार्यक्रमासाठी निवेदिका होण्याची संधी दिली. पण दृकश्राव्य माध्यमाची निवेदिकाच दृष्टीहीन असा किंतु तिच्या मनात आला. पण दृष्टी असली की सृष्टि बदलते हे उत्तर तिला आतूनच मिळाले आणि माझा संघर्ष चे पण तिने अनेक कार्यक्रम केले.

या तिच्या प्रवासात तिला मीनल मोहाडीकर, आकाशवाणी च्या नेहा खरे, सोनाली गोखले, शोभा कुंटे तसेच शशीकुमार लेले यांसारख्या लोकांची खूप साथ लाभली. सावरकरांमुळे ‘आधी सावर आणि मग कर, कृतिशील हो’ असा संदेश मिळाला असे अनघाला वाटते. वक्तृत्वकलेची सुद्धा तिला लहानपणापासूनच आवड़ आहे. तिला पद्यवाचनात विशेष रस आहे. ती स्वत: कविता करते. डबिंग आर्टिस्ट म्हणून तिने काम देखील केले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीसह तिला गुजराती आणि संस्कृत भाषेचे सुद्धा ज्ञान आहे. भविष्यात उर्दू आणि जर्मन यांसारख्या भाषा शिकण्याचीही तिची इच्छा आहे. आतापर्यंत तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

हे सगळं सुरु असताना अनघाला अनेक चांगले, वाईट अनुभव सुद्धा आले. त्यातून तिला अनेक प्रश्नही विचारले जायचे, पण तिने कशाचेही वाईट वाटून न घेता यातून मार्गक्रमण करत पुढे जाण्याचे ठरवले आहे. तिच्या डोळ्यांवर अजूनही उपचार सुरु आहेत. तरीसुद्धा अनेक प्रश्नचिन्हं तिच्या डोळ्यासमोर आहेत. पण त्याची उदगारचिन्हं करायचे तिने ठरवले आहे. कारण जोपर्यंत प्रश्नचिन्हं आहेत तोपर्यंत वाट वळणांची आहे. त्यांची उदगारचिन्हं झाली कि ती वाट सरळ, सोप्पी होईल. या दु:स्वप्नांचे तिने अनवट अभंगात रूपांतर करण्याचे ठरवले आहे. दुःखांनी टोचत बसत कायर नाही तर त्यांना गुणगुणत तिला शायर व्हायचे आहे. शब्द हीच अनघाची दृष्टी आहे.  एकंदरीतच, तरुणांना आणि सातत्याने अडचणींचा पाढ़ा वाचत असलेल्या सर्वांसाठीच अनघाचे व्यक्तिमत्व हे प्रेरणादायी आहे.

Designed and Developed by SocioSquares