mkaiay-maexj

रमाबाई रानडे : ( १८६२ -१९२४ )

‘रमाबाई रानडे’ ह्या भारतातील पहिली स्त्री आहेत ज्यांनी १८८३ मध्ये झालेल्या सभेला उपस्थिती लावून इंग्रजीत भाषण केलं. अनेक समाजसुधारकांपैकी रमाबाई या एक श्रेष्ठ समाजसुधारक होत्या ज्या महिलांच्या हक्कांसाठी झगडत होत्या. २५ जानेवारी १८६२ साली जन्मलेल्या रमाबाईंचा विवाह महादेव गोविंद रानडे यांच्यासोबत वयाच्या ११व्या वर्षी झाला. रमाबाई आणि महादेव रानडे यांच्यामध्ये २१ वर्षांचे अंतर असूनही एकमेकांना समजून घेण्यात ही वयाची दरी त्यांच्या आड आली नाही. अजाणत्या वयात त्यांना योग्य जोडीदार लाभला.

रमाबाईंना नवीन गोष्टी शिकण्याचे कुतूहल आणि ज्ञानाची भूक होती. त्याच गोष्टीला त्यांचे पती महादेव रानडे यांच्यामुळे आणखीनच प्रेरणा मिळाली. महादेव रानडे यांनी रमाबाईंना मराठी आणि इंग्रजी लिहायला आणि वाचायला शिकवले. दिवसातून केवळ २ तासाच्या शिकवणीतून रमाबाई लिहायला आणि वाचायला शिकल्या.

अनेक स्त्रियांच्या सक्रिय सहभागातून आणि मदतीने त्यांनी मुलींसाठी शाळा सुरु केली. त्यावेळी असंख्य लोकांकडून याला विरोध झाला; पण अशा परिस्थितीत त्यांचे पती महादेव रानडे रमाबाईंच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि सामाजिक संघर्षाला तोंड देऊन हि संस्था उभारली गेली.

रमाबाईंनी पुण्यामध्ये ‘सेवा-सदन समाज’ नावाची संस्था स्थापन केली. थोडक्या कालावधीतच याच्या अनेक शाखा मुंबईमध्ये देखील सुरु झाल्या. कर्तव्यदक्ष गृहिणी बनवणे , त्यांना चांगला नागरिक बनवणे आणि तळागाळातील महिलांना एक सक्षम आयुष्य मिळवून देण्यासाठी मदत करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय. याबरोबरच रमाबाईंनी नर्सिंग आणि औषधांच्या क्षेत्रात देखील संस्थेचे अंग विस्तारले. अनेक उच्च वर्गीय विधवा स्त्रिया आणि मुलींनी या नर्सिंग आणि औषधांचे धडे घेण्यास सुरुवात केली. समाजतील अनेक दुर्बल आणि गरजूंचे पुनर्वसन या संस्थेमार्फत केले गेले.

मताधिकार चळवळीमध्ये रमाबाईंनी सक्रिय सहभाग घेतला. गरजू स्त्रियांना मदत करण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असायच्या. रमाबाईंचे पती महादेव रानडे यांचे निधन १९०१ साली झाले. त्यानंतरही त्यांनी समाजसुधारणेचे कार्य अखेरच्या श्वासापर्यंत सुरु ठेवले.

समर्पणात्मक निष्कर्ष :
रमा ते रमाबाई रानडे हा त्यांचा प्रवास खरोखरच अतुलनीय आहे. त्यांनी आपल्या कर्तुत्वातून इतर स्त्रीयांसमोर एक आदर्श उभा केला आहे. आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असेल तर ते करण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही अशी प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळते.

Designed and Developed by SocioSquares