Archives

admin

March 30, 2018

बायका बोलक्या, बडबड्या असतात. चार डोकी जमली, की लागलीच चर्चासत्र भरतात. अमक्या तमक्याचं, वरवरचं, गावभरचं किती विषयावर बोलतात, तरी जे बोलायला हवं तेच नेमकं दडवून ठेवतात. अगदी मनातलं? खोलवरचं? त्या खरचं बोलतात का? स्वत:ची चूक नसूनही लाजीरवाणं करतात, ते लैगिंक अत्याचाराचे कटू क्षण. अशा विकृतीला बळी पडलेल्या स्त्रिया तिचा दु:खद अनुभव कधीच कुणा सांगण्या धजावत नाहीत. चारचौघांत उघडपणे न बोलून, मूक गिळून गप्प बसणे पसंत करतात. कारण, प्रश्न स्वत:च्या, घराच्या इज्जतिचा असतो. व्यक्तिमत्त्वाला गालबोट लागणार या विचारानेच थरकाप उडतो. चर्चा होईल, नावं ठेवतील, बोलं लावतील, रस्त्यानं जाताना वळून वळून पाहातील, सगळ्यांहून वेगळं काढतील, नातं कायमचं तोडतील अशा पिढीजात पोसलेल्या मानवी स्वभावांना शरण न जाता, अबोलपणा सोडून दुर्दैवी अनुभव जगासमोर सांगत स्त्रीने ‘बोलकं’ व्हायला हवं! हेच म्हणतेय मी टू मोहिम!

जगभरातील स्त्रियांना ‘न घाबरता बोल’ म्हणतेय, सोशल मिडीआच्या सहाय्याने एकसंध बांधतेय. अनेक स्त्रिया या आवाहनाला स्विकारुन लैगिंक अत्याचाराबाबतचे स्वानुभव खुल्यामनाने सांगतायेत. मुख्यत्वे, सिनेतारका, उच्चपदावर कार्यरत असणा-या स्त्रिया मोठ्या धैर्याने, वर्षानुवर्षे जड झालेले मन बोलून हलके करतायेत. मोहिमेची बांधणी भक्कम होतेय. यासा-याचा सार म्हणजे, सामान्य महिलांना निदान ‘आपण एकटे नाही’ या विचाराची सोबत मिळतेय. पण, त्या कदाचित इतक्यात बोलणार नाहीत. लहानपणापासून मनावर बिंबवलेलं ‘कुणाकडे बोलू नकोस’ हे वाक्य इतक्या सहजी कसं पुसलं जाईल?

मुली असा प्रसंग ओढवल्याचे आई, बहिणी किंवा मैत्रिणीकडे बोलण्यास चाचरतात आणि बोलल्याच तर मंडळी तिलाच गप्प बसण्याचा, कुणाकडे याबद्दल न बोलण्याचा सल्ला देतात किंवा  तिच्याच वागण्यातली खोट दाखवली जाते. यामुळे, लैगिंक छळ करणारा मोकाट सुटतो आणि ती घडल्या घटनेचे दडपण घेऊन जगू लागते, नकळत तिच्यामनात स्वत:विषयाचा न्यूनगंड वाढीस लागतो. पुढे ती देखील नव्या पिढीला असेच मौन बाळगण्याचा सल्ला देते. झालं! लहान रोपट्याची वाढ पुन्हा इथेच खुंटते, त्याला मनसोक्त फोफवण्यास वाव मिळत नाही. म्हणून, संस्कार देणारी मातीच जरा चाचपडून पाहायची गरज आहे. तिला सुपिक बनविणारे ‘विश्वासरुपी’ खत घालायला हवे. लहान मुलींना मनमोकळं बोलण्याचं स्वातंत्र्य द्या, त्यांच ऐका, त्यांच्यावर विश्वास ठेवा. बघ्याची भूमिका न घेता, तिला भक्कम साथ देऊन न्यायाची मागणी करा.

लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेची नाही, तर तो अत्याचार तिच्यावर लादणा-याची मान शरमेने खाली जायला हवी. यासाठी, आपली व्यथा सांगणा-या स्त्रीवर किमान विश्वास दाखवण्याची गरज आहे. #MeToo म्हणत स्वत:वर ओढवलेला अघटीत प्रसंग सांगण्याची हिंमत करणा-या स्त्रियांना फक्त सहानुभूती न देता, तिला न्याय मिळवून देण्यासाठी आग्रही असायला हवे. तसेच, #MeToo मोहिमेत सामील होऊ, बेडरपणे स्वत:चे अनुभव सांगून मनमोकळे बोलण्याचा हा प्रपंच असाच सुरु ठेवूया. साथ स्वत:ला स्वत:ची देऊ, मग सा-याजणी आपसूकच एक होऊ!

admin

May 6, 2017

आपण कुठल्याही पदार्थाच्या चवीसोबत त्याच्या सुरुक्षिततेबाबतही चोखंदळ असतो. त्यामुळे, हॉटेलपेक्षा आपल्या हक्काच्या प्रयोगशाळेत म्हणजेच घरातील किचनमध्ये नव्या रेसिपीज् करुन पहाणा-या उत्साही सुगरणींसाठी घेऊन आलोय थंडगार आईस्क्रीमच्या लज्जतदार रेसिपीज!!

बदाम कुल्फी
साहित्य- ३ कप दुध, १/४ कप ताजा मावा, १/२ कप साखर, १/२ कप बदामाचे काप, २ टि. कॉर्न फ्लॉवर, १/२ टि. वेलची पूड, चिमूटभर केशर
पाककृती – प्रथम दूध गरम करुन आटवावे. आटवताना ३ ते ४ मिनिटांनी त्यामध्ये साखर घालावी. मिश्रण सतत ढवळत रहावे व दूध साधारण अर्धे होईपर्यंत आटवावे. मावा हाताने मोकळा करुन घ्यावा. दूध घट्टसर झाले की वेलची पूड, केशर, मावा मिसळावा. मिश्रण थोडे गरम करावे व कोमट झाले की कुल्फीपात्रात मिश्रण ओतून फ्रिजरमध्ये सेट होण्यास ठेवावे. थंडगार कुल्फी घट्ट झाली की सर्व्ह करावी.

आंब्याचे आईस्क्रीम
साहित्य- दीड वाटी थंडगार व्हिपिंग क्रिम, दोन कप आंब्याचा रस, पाऊण वाटी पिठी साखर, वेलची पूड
पाककृती- साधरण मध्यम आकाराचे खोलगट काचेचे बाउल घ्यावे व अर्धा तास फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवावे. गार झालेल्या बाउलमध्ये व्हिपिंग क्रिम घालून ते फेटून घ्यावे. क्रीम थोडे फ्लफी व्हायला लागले, की हळूहळू त्यामध्ये साखर घालून पुन्हा फेटून घ्यावे. आता या मिश्रणात आंब्याचा रस व वेलची पूड घालावी. आता, मिश्रण पुन्हा नीट घोटून घ्यावे. तयार मिश्रण प्लॅस्टिक किंवा स्टिलच्या भांड्यात पसरवून २ तास फ्रिजमध्ये ठेवावे व मिश्रणास मिक्सरमध्ये फिरवावे. साधारण, एक दोनचा असे केल्यावर आईस्क्रीम सेट होण्यास फ्रिजरमध्ये ठेवावे.

द्राक्षाचे आईस्क्रीम
साहित्य – ५०० ग्रॅ. द्राक्षे, ५०० ग्रॅ. दही, एक पेला साखर, अर्धा पेला दूधाची पावडर, अर्ध्या लिंबाचा रस, पाव पेला क्रीम.
पाककृती – प्रथम द्राक्षे धुवून मिक्सरमध्ये त्याचा पल्प करुन तो गाळून घ्यावा. दही पातळ कपड्यात बांधून दोन तास टांगून ठेवावे. पाणी निथळून गेलेल्या या दह्यामध्ये पिठीसाखर, दुधाची पावडर, लिंबाचा रस व द्राक्ष्यांचा पल्प मिसळावा. हे मिश्रण सेट होण्यास फ्रिजमध्ये ठेवावे. साधारण दोन तासांनी मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. पुन्हा सेट करण्यास ठेवावे व गारेगार आईस्क्रीम सर्व्ह करावे.

अननसाचे आईस्क्रीम
साहित्य – एक अननस, दोन वाट्या क्रीम, अर्धी वाटी साखर, पायनॅपल इसेन्स, तीन मोठे चमचे दूधपावडर, एक चमचा लिंबाचा रस,
पाककृती- अननसाचे तुकडे करुन त्याचा मिक्सरद्वारे त्याचा पल्प तयार करुन घ्यावा. साखर, दूध पावडर व पल्पचे मिश्रण सेट होण्यास फ्रीजमध्ये ठेवावे. साधारण दोन तासांनी पुन्हा मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. आता, क्रीममध्ये लिंबाचा रस व इसेन्स घालून मिश्रण चांगले फेटून घ्यावे. फेटलेले मिश्रण मुख्य मिश्रणामध्ये घालून एकजीव करुन घ्यावे. आता तयार, आईस्क्रीम सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे.

मैत्रिणींनो, मे महिना म्हणजे शाळांना सुट्टी, तेव्हा दिवसभर घरी असणा-या मुलांचा मूड फ्रेश करण्यासाठी त्यांना होम मेड आईस्क्रीम्सची ट्रिट द्या. विविध स्वांदाची घरच्याघरी बनवता येणारी आईस्क्रीम्स तुम्ही नक्की करुन पाहा व तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा तुमच्या कमेन्ट्सद्वारे!

Designed and Developed by SocioSquare